पुणे - झोमॅटो आणि स्विगीची होम डिलिव्हरी करता करता महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणाऱ्या तीन चोरट्यांना हडपसर पोलिसांनी अटक केली. तब्बल 500 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासत पोलिसांनी चोरट्यांनी अटक केली. आरोपींच्या ताब्यातून 1 लाख 97 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
हेही वाचा - गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक अमित लुंकड अटकेत
आकाश सिद्धलिंग जाधव (वय 23, झोमॅटो डिलिव्हरी बॉय) विजय जगन्नाथ पोसा (वय 22 स्विगी डिलिव्हरी बॉय) आणि साहिल अनिल गायकवाड (वय 22) अशी अटक झालेल्या आरोपींची नावे आहेत.
पाचशेहून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले
काही दिवसांपूर्वी हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका जेष्ठ महिलेची सोनसाखळी अज्ञात चोरट्याने चोरून नेली होती. हडपसर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली. ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या भागातील पाचशेहून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासत पोलिसांनी आरोपींचा माग काढला. यातील एका आरोपीच्या दुचाकीवर पोलिसांना झोमॅटोची डिलिव्हरी बॅग दिसली. त्यानंतर हडपसर पोलिसांच्या तपास पथकातील कर्मचाऱ्यांनी आरोपींची नावे निष्पन्न केली आणि शेवाळेवाडी परिसरात सापळा रचून त्यांना अटक केली.
दोन गुन्ह्यातील १ लाख ९७ हजारांचा मुद्देमाल हस्तगत
आरोपी आकाश जाधव हा 16 जून रोजी हडपसर परिसरातील निर्मल टाऊनशिपमध्ये खाद्यपदार्थ डिलिव्हरी देण्यासाठी गेला होता. यावेळी त्याने इतर दोन आरोपींच्या मदतीने एका महिलेच्या गळ्यातील मंगलसूत्र चोरले होते. हा गुन्हा पचल्यानंतर त्यांनी चंदन नगर परिसरात देखील अशाच प्रकारे गुन्हा केला. पोलिसांनी या दोन्ही गुन्ह्यांतील 1 लाख 97 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सौरभ माने करीत आहेत.
ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणराव विधाते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम, पोलीस निरीक्षक राजू अडागळे, दिगंबर शिंदे त्यांच्या सूचनेप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक सौरभ माने, पोलीस कर्मचारी प्रदीप सोनवणे, प्रताप गायकवाड, गणेश क्षिरसागर, अविनाश गोसावी, समीर पांडुळे त्यांच्या पथकाने केली.
हेही वाचा - अजित पवार आणि पोलिसांच्या मदतीने निवृत्त शिक्षकांना मिळाली हक्काची जमीन