पुणे - पिंपरी-चिंचवड शहरातील भोसरी येथे प्रेमप्रकरणातून मित्राने मित्राचा कटरने गळा कापून खून करण्याचा प्रयत्न केला. ही घटना शुक्रवारी घडली असून शनिवारी गुन्हा दाखल झाला आहे. जखमी तरुणावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
आरोपी अटकेत
अभिषेक ऊर्फ आकाश मधूकर कांबळे (वय 26, रा. बालाजी नगर झोपडपट्टी भोसरी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. याबाबत शुभम मधूकर कांबळे (वय 20, रा. बालाजीनगर झोपडपट्टी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, किरण शिवाजी थोरात (वय 23) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास अभिषेक आणि त्याचा मित्र किरण हे दोघेजण अभिषेक याच्या दुचाकीवरून इंद्रायणीनगरकडून बालाजीनगरकडे जात होते. त्यावेळी प्रेमसंबंधाच्या कारणावरून किरण याने अभिषेकचा गळा कापला. यामध्ये अभिषेक गंभीर जखमी झाला. याबाबत किरणच्या विरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी किरणला अटक केली आहे.
हेही वाचा - नवलच.. बारामतीत चक्क बोकडाचा केक कापून दणक्यात साजरा झाला वाढदिवस
हेही वाचा - इंदापूरातील झगडेवाडीत जिल्हाधिकाऱ्यांची भेट, मनरेगाच्या कामाची केली पाहणी