पुणे - येथील औंध परिसरात सायंकाळच्या वेळी भर चौकात खुनाचा थरार पाहायला मिळाला. पूर्ववैमनस्यातून एका 23 वर्षीय तरुणाची कुऱ्हाडीने सपासप वार करून हत्या करण्यात आली. क्षितिज लक्ष्मीकांत वैरागर (वय 22) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. चतु:शृंगी पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. अनिकेत दिलीप दिक्षीत (वय 23) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
हेही वाचा - 'शरद पवारांनी आता स्वतःचीच मागणी पूर्ण करत शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी'
सोमवारी सायंकाळच्या सुमारास हा प्रकार घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत तरुण आणि आरोपी एकाच परिसरात राहण्यासाठी आहेत. तीन महिन्यापूर्वी त्यांच्यात पैशावरून वाद झाला होता. याच वादाचा राग मनात धरून आरोपी अनिकेत दिक्षीत याने क्षितिज वैरागर याचा खून केला. सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास क्षितिज मित्रांसमवेत औंध परिसरातील मलींग चौकात गप्पा मारत थांबला होता. यावेळी पाठीमागून आलेल्या अनिकेत दिक्षीत याने त्याच्या डोक्यात कुऱ्हाडीचे घाव घालून ठार केले. सायंकाळच्या वेळी घडलेल्या या प्रकाराने काही काळ या परिसरात तणाव पसरला होता.
दरम्यान, खून झाल्याची माहिती मिळाल्यानंतर चतुःशृंगी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या क्षितिज याला पोलिसांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले. परंतु, उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर पोलिसांनी तातडीने आरोपीला अटक केली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक विजयकुमार लांबतुरे करीत आहेत.