पुणे - केवळ पुण्यातील नव्हे तर जगभरातील गणेशभक्तांचे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती हे श्रद्धास्थान आहे. या गणरायाची आरती यंदाच्या गणेशोत्सवात जगभरातील तब्बल दोन लाखाहून अधिक गणेशभक्तांनी स्वतःच्या घरातून केली. उत्सवाच्या आठव्या दिवसापर्यंत सुमारे 60 देशातील भाविकांनी 'अँगमेंटेंड रिऑलिटी' या तंत्रज्ञानाचा वापर करत आरती केली. तर 40 हजारहून अधिक भाविकांनी अनेकदा या तंत्रज्ञानाचा वापर केल्याचे दिसून आले आहे.
हेही वाचा - घरबसल्या पाहा दगडूशेठ हलवाई 'श्रीं' चा विसर्जन सोहळा
- यंदा गणेशोत्सवात अँगमेंटेंड रिऑलिटी या तंत्रज्ञानाचा वापर
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट सुवर्णयुग तरुण मंडळाच्यावतीने ट्रस्टच्या 129 व्या वर्षाच्या गणेशोत्सवात अँगमेंटेंड रिऑलिटी या तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. केंद्र व राज्य शासनाने केलेल्या आवाहनानुसार जास्तीत जास्त भाविकांनी ऑनलाईन दर्शन घ्यावे याकरिता या तंत्राचा वापर करण्यात आलेला आहे. डिजिटल आर्ट व्हीआरई चे संचालक अजय पारगे यांनी हे तंत्रज्ञान विकसित केलं आहे.
- सुमारे 60 देशातील भक्तांनी केली घरबसल्या आरती
ट्रस्टच्यावतीने दिलेल्या लिंकवर जाऊन घरी भक्तांनी आरती करतानाचा व्हिडिओ काढल्यास प्रत्यक्ष श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिराच्या गाभाऱ्यात श्री ची आरती करतानाचा व्हिडिओ तयार होत आहे. आपण गाभाऱ्यात उभे राहून प्रत्यक्ष आरती करत असल्याचा आनंद व्हिडिओ पाहून भक्तांना घेता येत आहे. भारतासह अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, युके, सिंगापूर, जर्मनी, कतार, न्युझीलँड, ओमन, नेदरलँड, मलेशिया, फ्रीडम, जपान अशा सुमारे 60 देशातील भक्तांनी या तंत्रज्ञानाचा वापर केला आहे.
- विविध मान्यवरांनी घेतला अनुभव -
पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, विधान परिषदेचे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, स्वामी गोविंददेव गिरी महाराज, माजी सेनाधिकारी डी.बी.शेकटकर, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर, डॉक्टर विजय भटकर, पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्यासह अनेक मान्यवरांनी या तंत्रज्ञानाचा वापर करून बाप्पाची आरती करण्याचा व्हिडिओद्वारे अनुभव घेण्याचा आनंद घेतला आहे.
हेही वाचा - गणेशभक्ताकडून दगडूशेठ गणपतीला १० किलो सोन्याचा मुकुट अर्पण