पुणे - कोंढवा परिसरात एका दाम्पत्याने श्वानांसह आपल्या स्वतःच्या मुलाला ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. त्यानंतर त्या मुलाची सुटका करून त्याच्या आई वडिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्या घटनेत महत्वाची घडामोड समोर आली आहे. त्या डांबून ठेवलेल्या श्वानांची काल महापालिकेच्या रेस्क्यू टीमकडून सुटका करण्यात आली.
हेही वाचा - सर्वांना विश्वासात घेऊनच बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकासाचा निर्णय होणार - माजी महापौर मुरलीधर मोहोळ
अधिक माहिती अशी की, पोलिसांना काल सोसायटीतील लोकांचा फोन आला होता. श्वानांना बाहेर काढलेले नाही, अशी त्यांची तक्रार होती. त्यानंतर पीएमसीच्या रेस्क्यू टीमसोबत दोन पोलीस पाठवून घरात असणाऱ्या कुत्र्यांचे रेस्क्यू करत त्यांची सुटका करण्यात आली. या रेस्क्यूत १५ श्वान जिवंत तर ३ मेलेल्या अवस्थेत आढळले आहेत. बाकीचे 4 आधीच त्या आई वडिलांनी सोडले आहे अशी प्राथमिक माहिती आहे. या सर्व कुत्र्यांना एनिमल शेलटर होम मध्ये सुरक्षित ठेवले आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
पुण्यातील कोंढवा येथे एका ११ वर्षांच्या मुलाच्या वाटेला अतिशय दुःखद वेळ आली होती. त्याला चक्क त्याच्याच आई वडिलांकडून दोन वर्षे श्वानांसोबत कोंडून ठेवण्यात आले होते. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे, या सगळ्या घटनेला स्वतः त्या मुलाचे आई आणि वडील जबाबदार आहेत. पुण्यातल्या कोंढवा परिसरातल्या कृष्णाई बिल्डिंगमध्ये ही धक्कादायक घटना घडली. कोंढवा पोलिसांनी पीडित मुलाच्या पालकांवर बाल संगोपन आणि संरक्षण न्याय कायद्यातल्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
पालक कोंढव्यातल्या कृष्णाई बिल्डिंगमधल्या वन बीएचके अपार्टमेंटमध्ये राहत होते. त्याच घरामध्ये श्वानांची 22 पिल्लेदेखील होती. कित्येक दिवसांपासून पीडित लहान मुलगा श्वानांच्या सहवासात राहत होता, त्यामुळे त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली होती. तसेच, तो पीडित मुलगा एवढे दिवस बंद खोलीत श्वानांसोबत राहिल्याने तो मुलगा श्वानासारखा वागत होता. एवढेच नाही तर कित्येक दिवसांपासून योग्य पोषण न मिळाल्याने तो मुलगा अशक्त झाला आणि त्याच्या मानसिक आरोग्यावरही परिणाम झाला आहे.
हेही वाचा - Ketaki Chitale Controversy : 'केतकीला चोप देणार, तेव्हाच तिची अक्कल ठिकाण्यावर येईल'