पणजी - केंद्रीय आयुष (स्वतंत्र प्रभार) व संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते कारभाट, चोडण येथे सामाजिक सभागृहाची (कम्युनिटी हॉल) पायाभरणी शुक्रवारी करण्यात आली. नाईक यांच्या खासदार निधीतून हे काम केले जाणार आहे. याप्रसंगी नाईक यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
पाचव्यांदा खासदार होण्यामध्ये उत्तर गोव्यातील नागरिकांचा सहभाग आहे. त्यांनी दिलेल्या जबाबदारीची पूर्ण जाणीव असून लोकसहभागातून समाजोपयोगी कामे करत असल्याचे नाईक यांनी यावेळी नमूद केले. धारगळ येथे प्रशस्त आयुष रुग्णालयाचे काम प्रगतिपथावर असून यातील पुढचे पाऊल म्हणजे रायबंदर येथील जुना दवाखाना आयुष मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या पाचही उपचारपद्धतीसह नव्याने सुरू करणार असल्याचे यावेळी नाईक यांनी जाहीर केले.
हेही वाचा... विमान 'टेक ऑफ' करताना धावपट्टीवर आली जीप; थोडक्यात टळला अपघात
कम्युनिटी हॉल समाजाच्या एकत्रिकरणासाठी पूरक ठरतो. समाजाने एकत्र आल्यास चांगले व गतिशील काम होते, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. काम लहान असले तरी भावी पिढीसाठी आवश्यक असून गावामध्ये सेवा रुजू करत आहे, असेही ते यावेळी म्हणाले. उत्कृष्ठ व आधुनिक बांधकामासह वर्षाच्या आत हे सभागृह उभे राहील, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. पंतप्रधानांच्या मार्गदर्शनात देशासमोरील एक एक अडचणी उमेदीने सोडविणे शक्य होत असून, देश चार पावले पुढे जात आहे. असे सांगत जनसहभागासाठी, सहकार्यासाठी त्यांनी उपस्थितांचे आभार मानले.