पणजी - गोव्यात विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. गोवा विधानसभेच्या 40 जागांसाठी निवडणूक होत आहे. 2017 पर्यंत काँग्रेस, भाजप, महाराष्ट्र गोमंतक पक्ष आणि गोवा फॉरवर्ड या चार पक्षात असलेली लढतीत आत्ता आम आदमी पक्ष आणि तृणमुल काँग्रेसने उडी घेऊन राज्यातील निवडणुकीचे समीकरण अजूनच किचकट करून ठेवले आहे. आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ( Arvind Kejriwal hits out at bjp and Congress ) आज पत्रकार परिषद घेत काँग्रेस आणि भाजपावर टीकास्त्र सोडले.
गेल्या दहा वर्षात भाजपाने काहीही विकास केला नाही, म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा गोव्यात येऊन पुढची पाच वर्षे गोवा लुटण्यासाठी सत्ता मागत आहेत, असे केजरीवाल म्हणाले.
मोदींच्या स्वागतासाठी जर भाजपा त्याच्या सभास्थळी एका रात्रीत हेलिपॅड उभारू शकते. तर गोव्यात पुन्हा एकदा भाजपाची सत्ता आली तर गोव्याचे रस्ते काही दिवसातच चकाचक होतील, असा टोला केजरीवाल यांनी मोदी आणि भाजपला लगावला.
गेली 10 वर्ष भाजपाने लुटले, त्याआधी काँग्रेसने लुटले आणि आत्ता पुन्हा काँग्रेस गोव्याला लुटण्यासाठी सत्ता मागत आहे. म्हणून काँग्रेसला दिलेले मत म्हणजे भाजपला मत आहे. कारण काँग्रेसमधून निवडून आलेले आमदार पक्षांतर करून भाजपात जातात, असेही केजरीवाल म्हणाले.
'आप'ला संधी द्या -
आम्हाला एक संधी द्या. मागच्या सात वर्षात दिल्लीत जनतेने भाजपला आणि काँग्रेसला सत्तेबाहेर फेकले म्हणून गोव्यात बदल करण्यासाठी आपला एक संधी द्या, अशी मागणी केजरीवाल यांनी जनतेला केली.
हेही वाचा - भाऊसाहेब बांदोडकर, मनोहर पर्रीकर यांची दूरदृष्टी घेऊन 'आप' काम करणार - मनिष सिसोदिया