पणजी - कर्नाटककडून होणार वीजपुरवठा आज दुसऱ्या दिवशीही सुरळीत होऊ शकला नाही. त्यामुळे दक्षिण गोव्यातील उद्योग आणि हॉटेलमध्ये जनरेटरचा वापर करवा लागत आहे. यावर उपाय म्हणून महाराष्ट्राकडून होणार वीजपुरवठा दक्षिणेकडे वळविण्यासाठी वीज कर्मचारी रात्रंदिवस परिश्रम करत आहेत, अशी माहिती गोव्याचे वीजमंत्री निलेश काब्राल यांनी दिली आहे.
गोवा विजेचे उत्पादन करत नाही. गोवा हे तळ महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांकडून वीज आयात करतो. त्यामुळे गोव्याला पावसाळ्यात विजेच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. गुरुवारी सकाळी 9 च्या सुमारास खंडीत झालेला कर्नाटककडील वीजपुरवठा आज संध्याकाळपर्यंत सुरळीत झाला नाही. त्यामुळे दक्षिण गोव्यात मोठ्या प्रमाणात विजेची समस्या निर्माण झाली आहे.
'पावसाळ्यात अशा समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गोमंतकियांना सहकार्य करावे. वीज कर्मचारी, मंत्री हे देखील माणसंच आहेत. त्यांना काम करण्याच्या मर्यादा आहेत हे लोकांनी विचारात घ्यावे', असे आवाहन गोव्याचे वीजमंत्री नीलेश काब्राल यांनी केले आहे.
कर्नाटकमधून होणारा वीजपुरवठा हा वनक्षेत्रातून येतो. यामध्ये 40 किलोमीटर अंतर कर्नाटक तर 40 किलोमीटर अंतरावर गोवा सरकार देखरेख करत असते. वनक्षेत्रातून वीज वाहिन्या जात असल्याने त्याच्या दुरूस्तीसाठी अधिक वेळ खर्च करावा लागतो.
थेट छत्तीसगडमधून वीज आयात
विजेची वाढती मागणी विचारात घेऊन थेट छत्तीसगड राज्यातून वीज आयात केली जाणार आहे. यासाठी धारबांदोडा येथे 400 किलोवँट क्षमतेचे उपकेंद्र उभारण्याचे काम सुरू आहे. यासाठी केंद्र सरकार सहकार्य करत आहे. गोवा सरकारने याकरीता जमीन संपादन करून काम सुरू केले आहे, अशी माहिती काब्राल यांनी दिली.