पणजी - राज्य सरकारच्या स्वयंपूर्ण गोवा या योजनेच्या माध्यमातून क्रीडा क्षेत्रात सरकार नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत आहे. राज्यात क्रीडा क्षेत्रात देशातील नंबर एकचे इन्फ्रास्ट्रक्चर उभारण्याचे काम सरकारकडून हाती घेण्यात आले आहे. राज्यातील खेळाडूंना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्यासाठी लागणाऱ्या सुविधा एकाच छताखाली निर्माण करून देण्यासाठी सरकारने उत्तर गोव्यातील शंभर एकर राखीव जागेवर स्पोर्ट्स सिटी उभारण्याचा निर्णय घेतला आहे. अशी माहिती मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी दिली.
शासकीय सेवेत खेळाडूंसाठी पाच टक्के जागा राखीव -
राज्यात राष्ट्रीय स्तरावर उत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना शासकीय सेवेत पाच टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या असून खेळाडूंनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी केले आहे.
इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये गोवा नंबर एकवर -
राज्यातील खेळाडूंना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचण्यासाठी राज्य सरकार स्टेडियम, मैदाने व खेळाडूंवर लाखो रुपये खर्च करीत आहे. गोवा राज्य देशभरात स्पोर्ट्स इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये एक नंबरवर असल्याचे क्रीडा मंत्री बाबू आजगावकर यांनी सांगितले.
स्टेडियम ना खेळाडूंची नावे -
राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर कर्तृत्व गाजविलेल्या खेळाडूंची नावे राज्यातील स्टेडियमला देण्यात येणार असून कोविड काळातही 60टक्के शिक्षकांनी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रित्या विद्यार्थ्यांना क्रीडा विषयात मार्गदर्शन केले आहे. यात मुख्यत्वेकरून योगासने, सूर्यनमस्कार, झुंबा नृत्य या क्रीडाप्रकारात शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
हेही वाचा - OBC Reservation : राज्य सरकार तयार करणार इंपिरिकल डेटा; सर्वपक्षीय बैठकीत एकमत