पणजी - राजकारण हे समाजाचे ॠण फेडण्यासाठी मिळालेली संधी असल्याचे आपण मानतो, असे प्रतिपादन केंद्रीय आयुष (स्वतंत्र प्रभार) तथा संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी रविवारी फोंडा तालुक्यातील केरी येथे केले. खासदार निधीतंर्गत केरी-फोंडा येथील ग्रामपंचायतीच्या सामाजिक सभागृहाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नाईक यांच्याहस्ते करण्यात आहे. करमळे-फोंडा येथील श्री राम मंदिरात आयोजित या कार्यक्रमात ते बोलत होते.
नाईक म्हणाले, की सभागृह बांधण्यास दोन वर्षे लागली असून गावकऱ्यांनी या सभागृहासाठी ठेवलेल्या सहनशक्तीमुळेच त्यांना त्याचा लाभ झाला याचे आपल्याला समाधान वाटत आहे. स्थानिक कलाकारांना नाट्य, संगीत क्षेत्रात असलेली स्वत:च्या अंगातील कला दाखवण्यासाठी अशा सभागृहाची अत्यंत गरज आहे. सभागृहासाठी खासदार निधी हा जनतेचाच पैसा असून तो परत जनतेच्या उपयोगी पडावा यासाठी आपला प्रयत्न आहे. राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सर्व एकत्र राहूया. भविष्यातही असेच आपले सहकार्य आणि साथ कायम राहणार अशी आशा व्यक्त करतो.
कला व संस्कृती तथा आदिवासी कल्याण मंत्री गोविंद गावडे म्हणाले, की हे सभागृह लहान असले तरी आसपासच्या परिसरामुळे हे सभागृह विशाल व सुंदर दिसत आहे. सरकारची सार्वजनिक वास्तू असे न मानता आपल्या गावची व स्वत:ची वास्तू असे समजून या नव्या सभागृहाची भविष्यातही स्वच्छता राखण्याची गरज आहे. उत्तर गोव्यात 25 वर्षे सातत्याने काम करत असलेले आणि अनेक विकासकामे राबवणाऱ्या केंद्रीय मंत्री नाईक यांचे आपण आभार मानत आहे. फोंडा तालूक्यात अनुसूचित जाती व जमातींच्या लोकांसाठी केरी गावात सभागृह बांधण्याचा आपला मानस होता. धार्मिक तसेच सार्वजनिक कार्यक्रमांसाठी एकत्र येण्यासाठी या सभागृहाचा उपयोग होणार असल्याचे गोवा मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष विश्वास सतरकर यांनी सांगितले.
या वेळी केरी ग्रामपंचायतचे सरपंच अनिशा गावडे, उपसरपंच रोहिदास केरकर, तसेच पंच सदस्य प्रतीक्षा गावडे, अनिल केरकर, तृप्ती नाईक, प्रसन्न नाईक आणि दीपक नार्वेकर हजर होते. या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात ग्रामस्थांनी हजेरी लावली होती.