पणजी - कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी गोव्यात सोमवारपर्यंत 1738 जणांना होमक्वारंटाईन करण्यात आले आहे. मात्र, मंगळवारी एकाही व्यक्तीला होमक्वारंटाईन करण्यात आलेले नाही. कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या 7 रूग्णांमधील 5 जणांच्या प्रकृतीत सुधारणा होऊन ते ठिक झाल्याने कोविड रुग्णालयातून डिस्चार्ज देऊन सरकारी क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे.
कोरोना विषाणू्च्या प्रसाराला रोखण्यासाठी गोवा सरकारने वेळीच अत्यावश्यक पावले उचलल्यामुळे याचा सामाजिक संसर्ग झालेला नाही. खबरदारीचा उपाय म्हणून काहींना रुग्णालयात क्वारंटाईन करण्यात आले आहे. संभाव्य कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आल्यामुळे 29 मार्चपासून आतापर्यंत 1738 जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.
29 मार्चपासून गोव्यातील कोविड-19 संदर्भातील मंगळवारपर्यंत होम क्वारंटाइन- 1738, फॅसिलीटी क्वारंटाईन -202, गोवा वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातील विलगीकरण विभागात मंगळवारी 5 जणांना दाखल केल्यामुळे आतापर्यंत अशा विभागात दाखल केलेल्यांची संख्या 147 झाली आहे. परंतु, सध्या केवळ 7 रुग्ण या विभागात आहेत. मंगळवारी तपासणीसाठी पाठवलेल्या 39 नमुन्यासह 479 झाली आहे. तर मंगळवारी आलेल्या 47 अहवालांसह एकूण 475 अहवाल प्राप्त झाले आहेत तर 4 अहवाल मिळालेले नाहीत.
3 एप्रिलपर्यंत सापडलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 5 जणांना इस्पितळातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. जे सरकारी क्वारंटाइनमध्ये आहेत. तर उर्वरित दोघे मडगाव येथील कोविड इस्पितळात असून उपचार घेत आहेत.
28 दिवसांत 24 प्रवाशांना क्वारंटाईन
केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्वानुसार गोव्यात मागील 28 दिवसांत 24 प्रवाशांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. तर मंगळवारी कोणालाही होम क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आलेले नाही.