पणजी : निवडणूक आचारसंहिता संपल्यानंतर तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर यांनी केलेले घोटाळे उघड करणार असल्याचा दावा वर्तमान सार्वजनिक बांधकाम मंत्री दीपक पावसकर यांनी केला आहे.
गोव्याचे तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून काम करताना सुदिन ढवळीकर यांनी केलेल्या घोटाळ्यांची माहिती आपण मिळवत आहोत. आचारसंहिता संपल्यानंतर जून महिन्यात सर्व घोटाळे उघड करणार, अशी माहिती पावसकर यांनी दिली.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बैठकीनंतर बोलताना पावसकर यांनी सांगितले, की राज्यात सुरु असलेल्या राष्ट्रीय महामार्गाचे काम 2020 पर्यंत पूर्ण होणार आहे. परंतु तोपर्यंत रस्त्यावरील खड्डे बुजवून पावसाळ्यापूर्वी रस्ता पूर्ववत करावा यासाठी मंगळवारी ठेकेदारांशी चर्चा करण्यात आली.
मंत्रीपदाचा ताबा घेतल्यानंतर विभागातील घोटाळा शोधून काढणार, या आश्वासनाविषयी विचारले असता पावसकर म्हणाले, "पदाचा ताबा घेतल्यापासून आचारसंहिता सुरू आहे. त्यामुळे आचारसंहिता संपल्याशिवाय काहीच करू शकत नाही. परंतु, आतापर्यंत हाती आलेल्या फाईल्समधून सार्वजनिक बांधकाम विभागात कोट्यावधींचा घोटाळा झाला असण्याची शक्यता आहे. अचूक माहिती समोर येण्यासाठी बैठक होणे आवश्यक आहे. परंतु आचारसंहिता संपल्याशिवाय काहीच होऊ शकत नाही. त्यामुळे 1 जून रोजी बैठक होईल, तेव्हा यातील खरी माहिती समोर येईल. विशेषतः पाणी प्रकल्प आणि मलनिस्सारण प्रकल्प यांची अनेक कामे रखडली आहेत. लोकांना पिण्यासाठी पाणी मिळत नाही. याची कारणे शोधून काढण्यात येतील."
डिसेंबर 2019 पर्यंत अपूर्ण कामे पूर्ण करण्यात येतील, असेही पावसकर यांनी सांगितले.