पणजी - मेरशीचे माजी सरपंच प्रकाश नाईक यांचा मृत्यू ही आत्महत्या नसून हत्याच असल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. तसेच जोपर्यंत संशयितांना अटक केली जात नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचे त्यांनी आज सांगितले.
हेही वाचा - पालिकेच्या अर्थसंकल्पातील ४५ टक्केच रक्कम खर्च
तिसवाडी तालुक्यातील मेरशीचे माजी सरपंच असलेल्या नाईक यांचा शुक्रवारी संशयास्पद मृत्यू झाला. त्याबाबत आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी नाईक कुटुंबीयांनी आज सकाळी घरी माध्यमांच्या प्रतिनिधींसमोर आपले म्हणणे मांडले. यावेळी त्यांचे बंधू विनय नाईक, मुलगा प्रीतेश, मुलगी, पत्नी, आई, बहीण अक्षया गोवेकर आदी कुटुंबीय उपस्थित होते.
यावेळी विनय नाईक म्हणाले, आपला भाऊ कधीच आत्महत्या करणारा नव्हता. जेव्हा सदर प्रकार घडला तेव्हा आम्ही मंदिरात होतो. त्यांच्या डोक्याला गोळी लागली होती. परंतु, अंगावर बेडशीट, छातीवर हात आणि वर मोबाईल अशा स्थितीत ते होते. त्यामुळे त्यांचा मृत्यू ही हत्या आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या संदेशात विल्सन गुदिन्हो आणि ताहिर अशी दोघांची नावे दिली आहेत. त्यांना अटक करावी. तसेच जोपर्यंत संशयितांना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही. त्यांना अटक केल्याशिवाय ते त्यांना त्रास कशासाठी देत होते हे उघड होणार नाही. पोलीस कारवाई पाहिल्यानंतर हे प्रकरण सीबीआयकडे द्यावे, कारण यापूर्वी त्यांच्यावर तीनवेळा हल्ला झाला होता, असेही नाईक यांनी सांगितले.
या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याचा तपास विशेष पोलीस करत आहेत. आज संध्याकाळपर्यंत प्राथमिक अहवाल मिळेल. तर, सोमवारी संपूर्ण अहवाल प्राप्त होईल. त्यानंतर पुढील चौकशीचे आदेश देण्यात येतील. संशयितांचा शोध घेतला जाईल, असे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले.