पणजी - योग आणि योगासने या विषयी सर्वसामान्यांना माहिती व्हावी यासाठी मिरामार येथील गोवा विज्ञान केंद्रात याविषयी चित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. गोवा विज्ञान केंद्राने वर्ल्ड ऑफ योगाच्या सहकार्याने आयोजित या प्रदर्शनाचे उद्घाटन गोव्याचे आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये 20 वेगवेगळ्या प्रकारची आसने आणि त्यांची संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. या वेळी योगाचे फायदे सांगण्यात आले. यासाठी परिसंवादाचे ही आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये राज्याच्या विविध भागातील विद्यार्थी आणि नागरिक सहभागी झाले होते.
याविषयी माहिती देताना गोव्याच्या योग प्रचारदूत नम्रता मेनन म्हणाल्या की, योग प्रचारासाठी गोव्याइतकी सुंदर जागा नाही. गोव्याला 'आधुनिक योग राजधानी' बनवण्याचा आमचा मानस आहे. यासाठी लोकांमध्ये योग म्हणजे काय?, योगाविषयी जाग्रुती करण्यात येणार आहे. गोवा विज्ञान केंद्राचे प्रकल्प समन्वयक व्यंकट दुर्गाप्रसाद म्हणाले की, आरोग्य विषयक जागृती करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. यामध्ये विद्यार्थी, नागरिक यांचा मोठा सहभाग होता. यावेळी आयोजित परिसंवादाचे उद्घाटन आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांच्या हस्ते करण्यात आले.