पणजी - गोवा निसर्ग सौंदर्याने संपन्न आहे. अजूनही अशी ठिकाणे असतील जेथे पर्यटक पोहचले नसतील. छाया पत्रकारांनी अशी ठिकाणे शोधून काढावीत ज्यामुळे पर्यटकांना पोहचण्यास मदत होईल, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. जागतिक छायाचित्र दिनानिमित्त गोवा छाया पत्रकार संघटनेच्यावतीने आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
पाटो येथील संस्कृती भवनाता आयोजित कार्यक्रमासाठी कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे, संघटनेचे अध्यक्ष संदीप देसाई, सचिव कैलास नाईक, माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे ज्येष्ठ चिरंजीव उत्पल पर्रीकर आणि माहिती आणि प्रसिद्धी खात्याच्या संचालक मेघना शेटगावकर आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना मुख्यमंत्री सावंत म्हणाले, या संघटनेने पुढाकार घेत गोव्यात छायाचित्रणाचा व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू केला तर त्यासाठी सरकारतर्फे आवश्यक मदत दिली जाईल. त्याबरोबर सहभागी प्रशिक्षणार्थींना सरकारतर्फे प्रमाणपत्र दिले जाईल. यामध्ये अनुसूचित जाती आणि जमातीमधील विचार विद्यार्थ्यांना समाज कल्याणतर्फे शिष्यवृत्ती दिली जाईल.
दरम्यान, संघटनेच्यावतीने शालेय आणि खुल्या गटात छायाचित्र स्पर्धा घेण्यात आली होती. त्याचे बक्षीस वितरण यावेळी करण्यात आले. तसेच ज्येष्ठ छायापत्रकार प्रशांत येळेकर, लॉरेन्स फर्नांडिस आणि मकरंद बर्वे यांचाही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला.
चित्र प्रदर्शनात मनोहर पर्रीकर यांचा राजकीय प्रवास
यावेळी भरवण्यात आलेले चित्र प्रदर्शन हे दिवंगत माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना समर्पित आहे. यामध्ये संघटनेच्या सदस्यांनी पत्रकारितेच्या निमित्ताने वेळोवेळी पर्रीकर यांची टिपलेली छायाचित्रे प्रदर्शनात मांडण्यात आली होती. त्याबरोबरच स्पर्धेतील छायाचित्रांचे प्रदर्शन मांडण्यात आले आहे.