पणजी - सद्यस्थितीत कोरोना विषाणूवर लस उपलब्ध नाही. त्यामुळे आपल्या आरोग्याची काळजी करत लोकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, असे आवाहन आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी गोमंतकीयांना केले आहे.
सध्या शिमगोत्सव सुरू आहे. यानिमित्ताने लोक एकत्र येत असतात. मात्र, कोरोना विषाणूचा प्रभाव पाहता लोकांनी गर्दीची ठिकाणे टाळावीत. तसेच काही देशांनी यापूर्वीच काही देशातील नागरिकांसाठी प्रवेश बंदी केली आहे. आज केंद्र सरकारनेदेखील काही देशातून भारतात प्रवेश करण्यावर प्रतिबंध केला आहे. गोवा इतर राज्यांच्या तुलनेत छोटे राज्य आहे. त्यामुळे लोकांनी आपल्या आरोग्याविषयी जागरूक राहणे आवश्यक आहे.
सर्व खात्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना कार्यालयात येताना मास्क वापरणे सक्तीचे करावे, असे आदेश आरोग्य सचिवांना आजच आदेश आले आहेत. तसेच खासगी उद्योजकांनी आपल्या कर्मचाऱ्यांना आवश्यक मास्क आणि स्टेरेलियम उपलब्ध करून द्यावे, असे सांगण्यात आले असल्याचेही राणे यांनी सांगितले. ज्यांना सर्दी झाली आहे अशांपासून दूर राहणे अथवा सदर व्यक्तीने गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात दाखल होऊन तपासणी करून घ्यावी, असा सल्लाही त्यांनी दिला.
हेही वाचा - पुण्यातील कोरोनाग्रस्तांची प्रकृती चांगली, संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन सतर्क - म्हैसेकर
दिवसभरात दुसरा संशयित दाखल -
कोरोना विषाणू बाधित असा दुसरा संशयित रूग्ण (तरुणी, वय - 23, रा. साखळी परिसर) बुधवारी दुपारी गोवा वैद्यकीय महाविद्यालयात इस्पितळात (गोमॅको) दाखल झाली आहे. 30 नोव्हेंबर 2019 पासून ती दुबईमध्ये होती. तर 8 मार्च 2020 रोजी गोव्यात दाखल झाली होती. मंगळवारपासून तिला खोकला आणि ताप येत असल्याने बुधवारी दुपारी गोमेकॉमध्ये दाखल करण्यात आले. तिला कोरोनाबाधित संशयितांसाठी तयार करण्यात आलेल्या विशेष विभागात भरती करण्यात आले आहे. तिची तब्येत स्थिर असल्याची माहिती गोमेकॉ सूत्रांनी दिली आहे. याआधी बुधवारी सकाळी इटलीहून आलेल्या एका तरुणास इस्पितळात भरती करण्यात आले आहे.