पणजी - गोव्यात होणारी 36 वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात होणार आहे. यासाठी सरकारी यंत्रणा राबत आहे, अशी माहिती गोव्याचे क्रीडा मंत्री मनोहर आजगावकर यांनी आज सभागृहात लेखी उत्तरात दिली.
मार्च 2019 मध्ये अपेक्षित असलेली ही स्पर्धा पुढे का ढकलण्यात आली, असा प्रश्न काँग्रेस आमदार रवी नाईक यांनी तारांकित प्रश्नोत्तरात विचारला होता. त्याला मंत्र्यांनी लेखी उत्तर दिले.
भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात येणारी ही स्पर्धा ऑक्टोबरमध्ये होणार आहे. लोकसभा निवडणूक आणि गोवा विधानसभेची पोटनिवडणूक, शाळा-महाविद्यालयायांच्या वार्षिक परीक्षा यांमुळे ही स्पर्धा पुढे ढकलावी लागली होती, कारण यामुळे सुरक्षा पुरविणे आणि स्वयंसेवक मिळणे कठीण होते, असे उत्तरात म्हटले आहे. या स्पर्धेसाठी अनेक ठिकाणी नव्याने स्टेडियम उभारण्यात येत आहे. तर काही जून्या मैदानांची दूरूस्ती करणे सुरू आहे. या महिन्यात सर्वकामे पूर्ण होतील असा अंदाज आहे.