पणजी - महाराष्ट्र राज्याप्रमाणे गोव्यातही विधानसभा निवडणुकीत (Goa Assembly Election 2022) महाविकास आघाडी स्थापन (Mahavikas Aghadi in Goa) करणार असल्याचे शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) यांनी सांगितले आहे. ते दोन दिवस गोवा दौऱ्यावर (Sanjay Raut in Goa) आहेत. संजय राऊत हे आज काँग्रेस राष्ट्रवादीसोबत आघाडीबाबत बोलणी करणार आहेत.
पुढील महिन्यात होणाऱ्या गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे निवडणूक प्रभारी संजय राऊत सोमवारपासून दोन दिवसांच्या गोवा दौऱ्यावर आले आहेत. यावेळी त्यांनी गोव्यात आघाडी करण्याबाबत पत्रकारांना माहिती दिली.
- गोव्यातही महाविकास आघाडी स्थापणार - राऊत
महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येऊन महाविकास आघाडी स्थापन केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर गोव्यातही हा प्रयोग करण्यात येणार असून, आज यासंदर्भात दोन्ही पक्षांशी चर्चा करणार असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले.
- काँग्रेस आणि गोवा फॉरवर्डची आधीच युती -
या आधीच काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड या दोन पक्षांनी गोव्यात युती केली आहे. त्यांच्यासोबत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्यास जागावाटपाचा मोठा तिढा निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आधीच काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड यांच्यात जागावाटपाचा तिढा सुटला नाही. त्यात राष्ट्रवादी आणि शिवसेना यांची भर पडल्यास हा विषय अधिकच गुंतागुंतीचा होऊ शकतो.