पणजी - म्हादई नदी पाणी वाटपाचा वाद सध्या सर्वोच्च न्यायालयात आहे. तरीही कर्नाटक राज्याला केंद्राने पेयजल प्रकल्पासाठी ना हरकत प्रमाणपत्र दिल्याने गोवा सरकारवर विरोधकांनी चौफेर टीका केली. तसेच नदीचे पाणी वळवले जात असल्याचे म्हटले होते. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी याबाबत विधानसभेत कबुली दिली असून कर्नाटकने म्हादईचे पाणी काही अंशी वळवले असल्याचे मान्य केले आहे.
हेही वाचा... मध्य प्रदेश : मुले चोरीच्या संशयावरून सहा शेतकऱ्यांना मारहाण, एकाचा मृत्यू
राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेत विरोधी पक्षांच्या आमदारांनी उपस्थित केलेल्या विविध प्रश्नांना मुख्यमंत्री सावंत यांनी उत्तरे दिली. यावेळी डॉ. सावंत यांनी, म्हादईबाबत सरकार कोणत्याही प्रकारची तडजोड करणार नाही, असे म्हटले. तसेच कर्नाटककडून येणाऱ्या प्रवाहाचे पाणी कमी झाले हे आमच्या लक्षात आले आहे. त्यामुळे पाणी किती वळवले आणि अजून काय शक्यता आहे, यावर जलस्रोत खात्याचे अभियंते लक्ष ठेवून आहेत. काही प्रमाणात कर्नाटकने पाणी वळवल्याची कल्पना केंद्रीय वन, पर्यावरण, आणि हवामान बदल खात्याला दिली आहे. तसे पत्र पंतप्रधानांनाही लिहिले असल्याचे सावंत यांनी म्हटले आहे.
हेही वाचा... कोरोनावर मात करण्याची ताकद आयुर्वेदात; जाणून घ्या काय आहेत उपाय ?
गोव्यात सुमारे 40 हजारांहून अधिक उद्योजकांनी जीएसटी नोंदणी केलेली नाही. ती पुढील दोन महिन्यात करून घ्यावी. त्यानंतर दंडात्मक कारवाई केली जाईल, असे प्रमोद सावंत यांनी म्हटले. तसेच पदाचा ताबा घेतल्यानंतर आपल्या नेतृत्वाखाली सरकारला फक्त दहा महिने पूर्ण होत आहेत. त्यातही अधिकाधिक प्रश्न सोडवण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे सावंत यांनी सभागृहात बोलताना म्हटले.