पणजी - माझ्या चित्रपटाच्या आशयाच्या शोधात संपूर्ण भारत फिरलो आहे. कोणत्याही चित्रपट निर्मात्यासाठी सामाजिक आणि राजकीय मुद्दे समजून घेणे महत्त्वाचे आहे. लेखक किंवा दिग्दर्शकाने समाजाप्रती संवेदनशील असले पाहिजेत. कोणाच्याही भावना न दुखावता आपल्याला आपला मुद्दा मांडता आला पाहिजे, असे मत निर्माता आणि दिग्दर्शक जॉन मॅथ्यू मथान यांनी व्यक्त केले. ते 51 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) भारतीय पॅनोरमाचे ज्यूरी आहेत.
येथे आयोजित केलेल्या 51 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील “DO YOU HAVE IT?” या शीर्षकाअंतर्गत आयोजित केलेल्या आभासी संवाद सत्रात ते चित्रपट पत्रकार फरदीन शहरीयार यांच्याशी संवाद साधत होते.
हेही वाचा - ईश्वराची निर्मिती मासिक पाळीमुळे अशुद्ध ठरत नसल्याचा संदेश देणारा' ब्रम्हा जननी गोपोन कोम्मोटी'
मथान यांनी दिग्दर्शित आणि निर्मिती केलेल्या ‘सरफरोश’ (1999) या चित्रपटासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला आहे. या चित्रपटाची कथा-पटकथा दोन्ही मथान यांनी लिहिली आहे. 'चित्रपटातील गाणी ही त्या चित्रपटाच्या कथेला पूरक असली पाहिजेत. ज्या वेळी या चित्रपटाची निर्मिती केली तेव्हा कमाईच्या दृष्टीने संगीत हा या चित्रपटाचा एक मोठा घटक होता. या चित्रपटात दोन रोमँटिक गाणी करण्याची चित्रित करण्याची कल्पना मला आवडली नव्हती', असे ते म्हणाले.
ते म्हणाले की, 'एखाद्या चित्रपटात रोमँटिक गाणी ठेवण्यासाठी आता चित्रपट निर्मात्यावर सक्ती केली जात नाही. चित्रपटाच्या व्यवसायासाठी आता याची आवश्यकता नाही. मी सरफरोश 2 ची पटकथा अंतिम करण्यापूर्वी ती अंदाजे 5 ते 6 वेळा लिहिली. सरफरोश-2 ची ही प्रत्यक्षातली पाचवी पटकथा आहे, ज्यावर आता चित्रपटाची निर्मिती केली जाईल.' सरफरोश-2 च्या पटकथा लेखन प्रक्रियेवर प्रकाश टाकताना मथान यांनी ही माहिती दिली.
सरफरोश 2 बद्दल अधिक माहिती देताना ते म्हणाले की, हा चित्रपट भारताच्या अंतर्गत सुरक्षेबाबत आहे. 'विविध समस्या असताना देखील भारताची अंतर्गत सुरक्षा किती मजबूत आहे हे यातून दाखविले जाईल.' या समस्या झेलणाऱ्या सीआरपीएफ कर्मचार्यांना हा चित्रपट समर्पित करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
भारतीय पॅनारमाचे ज्युरी-अध्यक्ष म्हणून काम करताना आलेल्या आपल्या अनुभवाबद्दल बोलताना ते म्हणाले की, 'मी 180 चित्रपट पाहिले आणि माझ्या लक्षात आले की, आपण किती वैविध्यपूर्ण आहोत.' ते पुढे म्हणाले, भारत हा एक उत्साहपूर्ण सक्रिय लोकशाही असलेला देश आहे. 'हा एक प्रेमळ देश आहे'.
हेही वाचा - राणा दग्गुबत्तीनिर्मित ‘मिशन फ्रंटलाईन‘ मधून बीएसएफ जवानांचा दृढनिश्चय व शौर्याला मानवंदना!