पणजी - कोविड संक्रमण रोखण्यासाठी गोवा सरकार सर्वतोपरी प्रयत्न तर आहे. यासाठी कोविड इस्पितळ व्यवस्थापन आणि चाचणी सुविधा उपलब्ध करण्यावर भर दिला जात आहे. येत्या मंगळवारपासून राज्यात दरदिवशी 5 हजारांहून अधिक कोविड चाचण्या केल्या जातील, अशी माहिती गोव्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी आज दिली.
कोविड संक्रमण कमी व्हावे यासाठी सरकारचा प्रयत्न-
डॉ. सावंत मडगाव येथे आले असता त्यांना याविषयी विचारण्यात आले. त्यावेळी डॉ. सावंत म्हणाले, कोविड संक्रमण कमी व्हावे यासाठी सरकारचा प्रयत्न आहे. त्यामुळे मडगाव येथील इएसआय रुग्णालय कोविड रुग्णालय म्हणून निवडण्यात आले आहे. तसेच दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात 150 खाटा तर बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात 60 खाटा वाढविण्यात आल्या असून कोविड केअर सेंटर कार्यान्वित करण्यात आली आहेत. ज्यांना लक्षणे जाणवतात यांनी तत्काळ चाचणी करून घेत रुग्णालयात दाखल व्हावे.
राज्यात रेमडिसिवीर पुरेशा प्रमाणात असून उद्यापर्यंत 1500 अतिरिक्त इंजेक्शन मिळणार आहेत, असे सांगून डॉ सावंत म्हणाले, ऑक्सिजन उत्पादकांना औद्योगिक वापराचा कमी तर वैद्यकीय वापराचा ऑक्सिजन उत्पादित करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. गोवा सरकारने साडेचार लाख नागरिकांच्या लसिरणाचे उद्दिष्ट ठेवले आहे, असेही ते म्हणाले.
राज्यात नवीन दीड लाख मात्रा उपलब्ध-
गोव्यासात आज कोविड लसिच्या दीड लाख मात्रा उपलब्ध झाल्या आहेत. यासाठी गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन यांचे आभार मानले आहेत. याबद्दलची माहिती त्यांनी समाजमाध्यमातून दिली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, गोव्यात रेमडिसिवीरची कमतरता नाही. प्रत्येक रुग्णाला उपचार देणे ही आमची जबाबदारी आहे. गरजूंना रेमडिसिवीर मिळेल याकडे सरकारचे लक्ष आहे.
सक्रीय रुग्ण संख्या 7 हजारांवर
गोव्यात को्विड रुग्ण तपासणी चाचण्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. आज दिवसभरात 3256 चाचण्या करण्यात आल्या. तर 951 नवे रुग्ण आढळून आले. ज्यामुळे सक्रीय रुग्ण संख्या 7 हजार 52 झाली आहे. दिवसभरात 11 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत 883 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. तर रुग्ण बरे होण्याचा दर 88.19 असून आज 531 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आतापर्यंत 59 हजार 277 जणांनी कोविड-19 वर मात केली आहे.
दरम्यान, गोव्यात लसिकरण सुरू असून आजपर्यंत 2 लाख 39 हजार 062 जणांना लस देण्यात आली आहे. ज्यामध्ये हिला डोस 1लाख 93 हजार 15 जणांना देण्यात आला आहे. तर 46 हजार 47 जणांचे दोन्ही डोस पूर्ण झाले आहेत.
हेही वाचा- चिंताजनक.. राज्यात २४ तासांत ५०३ रुग्णांचा मृत्यू, नव्या 68 हजार 631 कोरोनाबाधितांची नोंद