सिंधुदुर्ग - ऑक्सिजन अभावी गोवा मेडिकल कॉलेजमध्ये रुग्णांचे झालेले मुत्यू आणि वाढत चाललेला कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून राज्याच्या आरोग्यविषयक स्थितीचा आढावा घेतला.
व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतली बैठक
महाराष्ट्र आणि गोव्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासमवेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोरोना परिस्थितीविषयी बैठक घेतली. या बैठकीत गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते. दोन्ही नेत्यांनी राज्यपालांना गोव्यातील वास्तविक परिस्थितीची जाणीव करुन दिली.
शुक्रवारीही ऑक्सिजनअभावी आणखीन 13 रुग्णांचा मृत्यू-
गोव्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे परीस्थिती गंभीर होत आहे. गोवा मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये अजूनही कोविड रुग्णांच्या मृत्यूची संख्या थांबलेली नाही. शुक्रवारीही ऑक्सिजनअभावी आणखीन 13 रुग्णांचा मृत्यू झाला. राज्याच्या महाधिवक्ता यांनी ही माहिती मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाला दिली आहे. गोवा खंडपीठ ऑक्सिजन विषयाशी संबंधित अनेक याचिकांवर सुनावणी करत आहे. कोविड रुग्णांना रुग्णालयात ऑक्सिजन उपलब्ध करण्याचे आदेश कोर्टाने दिले होते. गोव्याला ऑक्सिजनचा कोटा लवकरात लवकर उपलब्ध होईल याची काळजी केंद्राने घ्यावी असे हायकोर्टाने म्हटले होते. याबाबतही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी माहिती घेतली
कोश्यारी यांनी सरकारला केल्या सूचना-
गोव्यात शुक्रवारी कोरोनाचे 2455 नवीन रुग्ण आढळले आहेत. नव्याने संसर्ग झालेल्या लोकांच्या संख्येपेक्षा बरे होणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे. शुक्रवारी कोरोना आजारातून 2960 लोक बरे झाले. तर 24 तासांत कोरोनामुळे 61 लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. दरम्यान आरोग्यविषयक आणि कोरोना विषयक स्थितीचा आढावा घेत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सरकारला सूचनाही केल्या आहेत.
हेही वाचा- काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांचे पुण्यातील जहांगीर रुग्णालयात निधन