पणजी - मासेमारी हा गोमंतकीयांच्या हातात असलेला एकमेव पारंपरिक उद्योग आहे. त्याचे संवर्धन करण्यासाठी गोमंतकीयांनी पुढे आले पाहिजे. यासाठी आवश्यक मदत करण्यासाठी राज्य सरकार तयार आहेच. परंतु, केंद्र सरकारकडूनही मदत मिळवून दिली जाईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पणजीत केले. 'अँक्वा गोवा मत्समहोत्सवा'चे उद्घाटक म्हणून ते बोलत होते.
मत्स व्यवसाय संचालनालयाने आयोजित केलेला हा महोत्सव शनिवार (दि.15) पर्यंत चालणार आहे. याच्या उद्घाटनप्रसंगी गोव्याचे मत्सोद्योग मंत्री फिलिप नेरी रॉड्रिग्ज, सार्वजनिक बांधकाम मंत्री दीपक पावसकर, आमदार प्रसाद गांवकर, आमदार फ्रान्सिस सिल्वेरा, पणजीचे महापौर उदय मडकईकर, खात्याचे सचिव पी. एस. रेड्डी, संचालक डॉ. शमिला मोंतेरो, गोवा मनोरंजन संस्थेचे उपाध्यक्ष सुभाष फळदेसाई आणि अभिनेत्री मुग्धा गोडसे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
मुख्यमंत्री सावंत म्हणाले, या महोत्सवात केवळ गोमंतकातीलच नव्हे तर जगाच्या अन्य भागातील मासे पाहता येणार आहेत. केवळ महोत्सव नसून यामध्ये मत्स व्यवसायाशी निगडित मार्गदर्शन, चर्चासत्रे, आयोजित केले जाणार आहे. 'नीलअर्थव्यवस्थे'कडे वळत असताना केवळ समुद्राच्या मासेमारीवर अवलंबून न राहता गोड्यापाण्यातील मासेही बारमाही कसे उपलब्ध करता याकरिता संचालनालयामार्फत मदत केली जाणार आहे. त्याबरोबर दक्षिण गोव्यात फातोर्डा येथे अत्याधुनिक असे मासळी मार्केट उभारण्यात येणार आहे. ज्यामध्ये शीतगृहाची सुविधा उपलब्ध असेल ज्याचा लाभ सर्वांनाच होईल. गोव्यातील नव्या पिढीला या व्यवसायात यायचे असेल तर त्यांनी याचा शास्त्रोक्त अभ्यास करावा, यामध्ये नवे संशोधन करण्याचा प्रयत्न करावा, ज्यामुळे क्रांतिकारी बदल घडून येतील, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
महोत्सवाच्या निमित्ताने या क्षेत्रात योगदान दिलेल्या मच्छीमारांचा यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यामध्ये अजित चोडणकर (उदयोन्मुख मच्छीमार), हर्षद धोंड (मदतगार मच्छीमार), जुआरी फिशरमँन मार्केटिंग को-ऑपरेटिव सोसायटी वास्को (उत्कृष्ट संस्था), मिंगेल रॉड्रिग्ज (अत्याधुनिक मच्छीमार), तर लिबर्टा, अँना मारिया कूलासो, आग्नेल फर्नांडिस, जुवांव लोबो आणि कायतान फर्नांडिस यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. शाल, श्रीफळ आणि स्मृती चिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. महोत्सवाच्या निमित्ताने अँक्वॉरिअम उभारण्यात आले आहे. ज्यामध्ये देशविदेशातील विविध प्रकारचे जीवंत मासे पाहता येणार आहेत. यासाठी लोकांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती.
दरम्यान, गोवा सरकारने 2 ऑक्टोबरपासून राज्यात एकेरी उपयोगाच्या प्लास्टिक वापरावर बंदी घातली आहे. परंतु, महोत्सवात थर्माकोलचा वापर करुन विविध वस्तू आणि माशांचे आकार बनविण्यात आले आहे. त्यामुळे तो चर्चेचा विषय ठरला होता. याविषयी कार्यक्रमानंतर मुख्यमंत्र्यांना विचारले असता, आपण याबाबत संचालकांना सूचना दिल्याचे त्यांनी सांगितले.