पणजी - स्मार्टसिटी प्रकल्पाने काय साध्य केले? याचा प्राधान्यक्रम सांगावा आणि तशी श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी गोवा सुरक्षा मंचच्यावतीने करण्यात आली आहे. पणजीमध्ये घेतलेल्या एका पत्रकारपरिषदेत त्यांनी ही मागणी केली आहे.
पत्रकार परिषदेला गोवा सुरक्षा मंचचे अध्यक्ष आत्माराम गांवकर, पणजी पोटनिवडणुकीतील भाजप उमेदवार सुभाष वेलिंगकर यांचे प्रचारप्रमुख महेश म्हांबरे, अॅड. स्वाती केरकर, मुकुंद कवठणकर आदी उपस्थित होते.
यावेळी अॅड. केरकर म्हणाल्या, की स्मार्टसिटी पणजीच्या समस्या सोडवू शकलेली नाही. येथे कोणत्याही पायाभूत सुविधा नाहीत. जशी गत प्रादेशिक आराखड्याची झाली तसेच स्मार्टसिटीचे होणार की काय? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. त्यामुळे सरकारने स्मार्टसिटी प्रकल्प राबवताना कशाला प्राधान्य दिले? आणि पणजीला काय फायदा झाला? हे पणजीवासीयांना सांगावे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे.
म्हांबरे म्हणाले, पणजीमध्ये अनेक समस्या आहेत. पणजीवासीयांना पिण्याएवढे पाणीही अद्याप सरकार देऊ शकले नाही. रोजगारही नाही. स्मार्टसिटीत पायाभूत गरजा पूर्ण होत नाहीत. येथे महापालिका आणि सत्ताधाऱ्यांचे साटेलोटे आहे. पणजीतील भाजप आणि काँग्रेसमध्ये 'सेटिंग्ज' आहे, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.
त्यामुळे या निवडणुकीत लोकांनी उमेदवारांची काम करण्याची क्षमता आणि चारित्र्य पाहून मतदान करावे, असे आवाहनही म्हांबरे यांनी यावेळी केले.