पणजी - गोव्यात काल रात्रीपासून कोसळत असणाऱ्या मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक भागात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या पूरग्रस्थ भागाचा आज सकाळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत, उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर आणि आरोग्यमंत्र्यांकडून दौरा करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी प्रशासनाला नागरीकांना योग्य ती मदत उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले.
अनेक नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी -
मागच्या चार दिवसांपासून कोसळत असणाऱ्या पावसाचा फटका राज्यातील ग्रामीण भागाला बसला आहे. राज्यातील डिचोली, साखळी तालुक्यांसाह दूधसागर कुले भागातील नद्यांना महापूर आला आहे. राज्यातील साळ, तिलारी, शापोर आणि कुले नद्यांनीही धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे पहाटे अचानक लोकांच्या घरात व शेतात पाणी घुसल्याने फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान, गोव्यात पुराचा सर्वाधिक फटका पेडणे तालुक्याला बसला असून येथील आमदार व राज्याचे उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी यावेळी या भागाचा पाहणी दौरा केला. पेडणे तालुक्यात बहुतांशी घरात पुराचे पाणी घुसल्यामुळे जनतेचे प्रचंड नुकसान झाले असून नुकसानग्रस्तांना वेळीच योग्य ती मदत उपलब्ध करून देण्याचे आदेश यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
अनमोड घाटात दरड कोसळली -
गोवा आणि कर्नाटक राज्यांना जोडणाऱ्या अनमोड घाटात पहाटे दरड कोसळल्यामुळे येथील वाहतूक ठप्प झाली आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आमदार व प्रशासनाला मदत करण्याच्या सुचना केली आहे. या कठीण परिस्थितीत राज्यातील सर्व आमदारांनी आपल्या मतदार संघात पाहणी दौरा करून जनतेला विश्वासात घेऊन धीर देण्याचे काम करावे, असे आवाहन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आमदारांना केले. यासोबतच जनतेला योग्य ती मदत उपलब्ध करून देण्याचे आदेशही प्रशासनाला दिले आहेत.
हेही वाचा - Kolhapur Floods : 2019 पेक्षाही धोकादायक परिस्थिती; फक्त शासकीय वाहनांना इंधन मिळणार - सतेज पाटील