पणजी - गोव्याला फिरायला जाण्यासाठी अनेकजण येतात. मात्र वंचित घटकातील मुलांना हे शक्य नसते. हे लक्षात घेऊन ६३ कैद्यांच्या वंचित मुलांच्या आयुष्यात आनंदाचे क्षण यावेत, यासाठी गोव्यातील संस्थेने पुढाकार घेतला आहे. या मुलांना १ मे'ला गोवादर्शन घडवून आणण्यात येणार आहे. ही माहिती अनामप्रेमचे (गोवा) प्रमुख चिंतामणी सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
समाजातील वंचित, गरीब आणि आदिवासी मुलांसाठी 'अनामप्रेम ' ही संस्था कार्यरत आहे. या संस्थेच्या कार्यक्रमांतर्गत अमरावती ( महाराष्ट्र) येथील मुले रविवारी २८ एप्रिलला गोव्यात येणार आहेत. त्यांना गोव्यातील विविध मंदिरे, जुन्या गोव्यातील चर्च, गोला विज्ञान केंद्र, गोव्यातील किल्ले हे सुंदर प्रेक्षणीय स्थळे पाहता येणार आहेत. याशिवाय पर्यटकांचे आकर्षण असलेले आयएनएस हंस हा नौसेनेचा तळ आणि नाविक संग्रहालय याची सफर करता येणार आहे.
मुलांमध्ये प्रेम निर्माण करणे, हा या कार्यक्रमामागील उद्देश आहे, असे सामंत म्हणाले. समाजातील वंचित घटकांना मुख्य प्रवाहाशी जोडणे यासाठी अनामप्रेमच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जात आहेत. यामध्ये विविध सामाजिक आणि पर्यावरण विषयक विषयांशी निगडीत उपक्रमांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला श्रीकांत बर्वे व अनंत जोशी आदी उपस्थित होते.