पणजी - कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर राज्यातील उपाययोजना आणि स्थितीचा आढावा गोवा राज्य कार्यकारी समितीने घेतला. राज्याचे मुख्य सचिव परिमल राय यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत कायदा आणि सुव्यवस्था, मालवाहतूक, निवासी शिबिरे आणि कोविडची सध्यस्थिती यावर चर्चा झाली.
पणजीतील वनभवनात पार पडलेल्या या बैठकीसाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान खात्याचे सचिव पुनित गोयल, वाहतूक सचिव एस. के. भंडारी, महसूल सचिव संजय कुमार आदी उपस्थित होते.
यावेळी अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. गोव्यात अद्याप कम्युनिटी ट्रान्समिशन झालेले नाही. त्यामुळे गोमंतकीय खलाशांना परत आणल्यानंतर त्यांना कशाप्रकारे क्वारंटाईन करता येईल, त्यांची चाचणी कशी करता येईल यावर केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्वानुसार कशाप्रकारे काम करावे लागेल याविषयीचा आराखडा आरोग्य सचिव नीला मोहनन यांनी समितीसमोर ठेवला. समुद्र मार्गे येणाऱ्या खलाशांसाठी गोवा सरकारच्या आरोग्य विभागाने मुरगाव बंदरात तर मुंबईहून रस्त्याने येणाऱ्यांसाठी महाराष्ट्र-गोवा सीमेवर पत्रादेवी येथे आवश्यक चाचणी सुविधा तयार केली आहे, हेही समितीच्या निदर्शनास आणून दिले.
यावेळी सर्वांच्याच 24 तासात चाचण्या करण्यात येतील. चाचणीचा अहवाल प्राप्त होईपर्यंत ते जहाजावरच राहतील. चाचणी निगेटिव्ह आली तर 14 दिवसांच्या सरकारी क्वारंटाईनमध्ये ठेवले जाईल, जर पॉझिटिव्ह आली तर कोव्हिड रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे. त्यांच्या राहण्या-खाण्याची व्यवस्था त्या़च्या कंपनीने करावी, असा निर्णय गोवा सरकारने घेतला आहे. खलाशांचे नमुने घेण्यासाठी विशेष कीयॉस्क तयार करण्यात आले आहे. मुरगाव येथे अशा प्रकारचे चार कीयॉस्क उभारण्यात आले आहेत. तेथे स्वॅब घेऊन डिचोली येथील प्रयोगशाळेत तपासणी केली जाईल, असे सांगून मोहनन म्हणाल्या की, जर कोणाला आपली कोव्हिड चाचणी करुन घ्यावी, असे वाटत असेल तर ते स्वखर्चाने करून घेऊ शकतात. गोवा सरकारच्या कार्याची केंद्र सरकारने प्रशंसा केल्याचेही त्यांनी सांगितले.
तर कृषी सचिव कुलदीप सिंग गांगर यांनी राज्यातील शेतीची कामे सुरळीतपणे सुरू आहेत. तर माहिती आणि तंत्रज्ञान सचिव अंकिता आनंद यांनी वेब अॅप्लिकेशनच्या माध्यामातून राज्याच्या सीमेवरील वाहनांवर लक्ष ठेवले जात आहे. तसेच प्रवेश करणाऱ्या वाहनांच्या हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे. त्याबरोबर पोलीस आणि कार्यकारी दंडाधिकारी अशा नोंदी ठेवत आहेत.
राज्याच्या विविध खात्यांच्या सचिवांनी आपापल्या खात्याकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. ज्यावर कार्यकारी समितीनेही काही सूचना करत सर्वांचे म्हणणे ऐकून घेतले.