पणजी - गोव्यात येणाऱ्या वाहनांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी गोवा पोलिसांनी माहिती-तंत्रज्ञान विभागाच्या सहकार्य अॅप तयार केले आहे. ज्यामुळे सीमेवर प्रवेश करतानाच त्या वाहनाची सर्वनोंद करून घेतली जाईल. ज्यामुळे त्याची हालचाल समजण्यास मदत होणार आहे.
कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी गोवा सरकार अधिकाधिक उपाययोजना आखून त्यावर कारवाईदेखील करत आहे. त्यामुळे गोव्यात संसर्ग रोखण्यात सरकार यशस्वी ठरले आहे. सामाजिक संसर्ग रोखण्यासाठी केंद्र सरकारने लॉकडाऊन जाहीर केले आहे. त्याबरोबरच त्याचा काळही 3 मेपर्यंत वाढविण्यात आला आहे. त्यामुळे राज्याच्या सीमाबंद करण्यात आल्या आहेत. कोणत्याही मार्गाने कोणीही प्रवेश करू नये, यासाठी देखरेख ठेवली जात आहे. अशास्थितीत जीवनावश्यक वस्तू दुसऱ्या राज्यातून आयात कराव्या लागत आहेत. अशावेळी येणारे वाहने कुठून आले आणि ते कधी कोणत्या दिशेने जाणार आहे. याची माहिती या अॅपवर सीमेवरच संकलित केली जाईल. त्यामुळे त्याला जर निर्धारित वेळेपेक्षा अधिक काळ अथवा मार्ग बदलावा लागला तर ते शोधून काढणे शक्य होणार आहे.
त्याबरोबर सीमेवर पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. पोलिस महानिरीक्षक जसपाल सिंग यांनी आज कर्नाटक-गोवा सीमेवरील सत्तरी तालुक्यातील केरी तपासणी नाक्यावर भेट देऊन स्वतः स्थितीचा आढावा घेतला. तसेच अन्य भागातील कामाचा आढावा दरदिवशी घेतला जात आहे.