पणजी - प्रमोद सावंत यांच्याच्या नेतृत्वाखाली गोव्यातील भाजप सरकार स्थिर आहे. 40 सदस्यांच्या सभागृहात भाजपकडे 27 सदस्य आहेत. तर, विरोधी पक्षात एकजूट नाही. त्यामुळे सद्यस्थितीत सरकारला धोका नसल्याचे दिसून येत आहे.
महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर गोव्यात राजकीय भूकंप होईल, असे शिवसेना खासदार संजय राऊत म्हणत आहेत. परंतु, शिवसेनेचा या सभागृहात एकही आमदार नाही. तर, प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसकडे 5 आमदार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडे 1, मगो 1, गोवा फॉरवर्डकडून 3 तर 3 अपक्ष आहेत. अपक्षांमधील प्रियोळ मतदारसंघाचे आमदार गोविंद गावडे सरकारमध्ये असून त्यांच्याकडे महत्त्वाची पदे आहेत. सांगे विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष आमदार प्रसाद गांवकर यांचा सरकारला बाहेरून पाठिंबा आहे, तर पर्वरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोहन खंवटे हे गोवा फॉरवर्ड भाजप सरकारमध्ये महसूलमंत्री होते. परंतु, काँग्रेसच्या 10 फुटीर आमदारांच्या भाजपप्रवेशानंतर मंत्रीमंडळ विस्तारताना गोवा फॉरवर्डबरोबर त्यांनाही डच्चू देण्यात आला होता.
गोवा सरकारबद्दल काय म्हणाले होते संजय राऊत वाचा या लिंकवर क्लिक करुन -
गोव्यात लवकरच राजकीय भूकंप - संजय राऊत
दरम्यान, 2017 मध्ये गोवा विधानसभेच्या सार्वत्रीक निवडणुकीत भाजप 13, काँग्रेस 17, गोवा फॉरवर्ड 3, मगो 3, राष्ट्रवादी काँग्रेस 1, अपक्ष 3 अशा जागा वाट्याला आल्या होत्या. मनोहर पर्रीकर यांना भाजप मुख्यमंत्री बनवणार असेल तर पाठिंबा देऊ म्हणत गोवा फॉरवर्ड आणि अपक्षांनी पाठिंबा देत भाजप आघाडी सरकार बनवले. त्यांचा बहुमत ठरावावेळी काँग्रेस आमदार विश्वजीत राणे (वाळपई) राजीनामा देत भाजपमध्ये गेले. तर, पणजीचे आमदार सिद्धार्थ कुंकळ्येकर यांनी राजीनामा देत पर्रीकर यांना मतदारसंघ रिकामा करून दिला.
याठिकाणी सहा महिन्यांत झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपचे दोन्ही उमेदवार राणे आणि पर्रीकर निवडून आलेत. त्यानंतर वर्षभरापूर्वी काँग्रेसच्या सुभाष शिरोडकर (शिरोडा) आणि दयानंद सोपटे (मांद्रे) यांनी राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला. दरम्यानच्या काळात म्हापसाचे आमदार फ्रान्सिस डिसोझा यांचे निधन झाले. त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचेही निधन झाले. त्यामुळे या ठिकाणी पोटनिवडणूक घेण्यात आली. ज्यामध्ये चार जागा भाजपने मिळवल्या. तर, पणजीमध्ये 25 वर्षानंतर काँग्रेस जिंकली होती. याकाळात मगोचे आमदार मनोहर आजगावर आणि दीपक पावसकर यांनी वेगळागट स्थापून भाजप प्रवेश केला. त्यांची मंत्रीपदी वर्णी लागली. त्यानंतर काही काळात काँग्रेसचे तत्कालीन विरोधी पक्षनेते चंद्रकांत (बाबू) कवळेकर यांच्याच्यासह 9 आमदार भाजपमध्ये गेले. त्यामधील काहींना मंत्रीपदे तर काहींना महामंडळ, विधानसभा सभापती अशी पदे मिळाली.
या काळात काँग्रेसने सभापतीपदासाठी प्रतापसिंह राणे यांना उमेदवारी दिली. परंतु, आपल्या 47 वर्षांहून अधिक राजकीय कारकिर्दीत एकदाही पराभूत न झालेल्या राणे यांना तेथेही पराभव पत्करावा लागला.