पणजी - गोव्याचे स्वतंत्र अस्तित्व राखण्यासाठी तसेच हिमाचलच्या धर्तीवर गोव्यासाठी वेगळा कायदा करण्याचा आग्रह संसदेत धरणार असल्याचे गोवा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी म्हणाले. गुरुवारी येथील काँग्रेस भवनात गोव्यासाठी स्वतंत्र्य जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
खाण व्यवसाय बंद झाल्यामुळे येथील मोठ्याप्रमाणात गोमंतकियांना बेरोजगारीचा सामना करावा लागला. काँग्रेस सत्तेवर आल्यानंतर कायद्याच्या चौकटीत खाण व्यवसाय सुरू केला जाईल. तसेच फॉर्मेलीनमुक्त मास्यांसाठी आवश्यक त्या सर्व तरतुदी केल्या जातील, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
नेमके काय आहे गोवा काँग्रेसच्या जाहीरनाम्यात? -
वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) आणि नोटबंदीमुळे मोठ्याप्रमाणात लोकांना रोजगार गमवावा लागला होता. पर्यटकांच्या संख्येत घट झाली आहे. त्यामुळे पर्यटनाचा विकास करण्यासाठी टुरिझम डेव्हलपमेंट बँक स्थापन करण्यात येईल. याचा लाभ पर्यटनाशी संबंधितांना देण्याचा प्रयत्न करण्यात येईल. तसेच पर्यटकांना 'व्हिसा ऑन अराईव्हल' दिला जाईल. तसेच एकवेळ नोंदणी करणाऱ्यांना पुढील ३ वर्षे नोंदणी शुल्कात सवलत दिली जाईल. मच्छीमार व्यवसायाला शेती समजले जाऊन शेतीचे सारे लाभ देण्यात येतील. कोणालाही विश्वासात न घेता बनवलेली सीआरझेड अधिसूचना रद्द करणार. तसेच यासाठी पारंपरिक मच्छीमारांना सुट दिली जाईल, आदी आश्वासनांचा या जाहीरनाम्यात समावेश करण्यात आला आहे.
धनगर समाजाला अनुसुचीत जमातीचा दर्जा देणार - कवळेकर
२०१४ च्या निवडणुकीत भाजपने सत्तेवर आल्यानंतर गोव्यातील धनगर समाजाला अनुसुचीत जमातीचा दर्जा देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, ५ वर्षे सत्तेत राहूनही हा दर्जा देण्यात आला नसल्याचे आरोपी विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांनी केला. तसेच काँग्रेस सत्तेवर आल्यानंतर गोव्यातील धनगर समाजाला अनुसुचीत जमातीचा दर्जा देण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.