पणजी - ढासळलेली अर्थव्यवस्था आणि म्हादई नदी पाणीवापट या दोन्ही प्रकरणांमध्ये केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेसने राजभवनावर मोर्चा काढला. प्रवेशद्वारापासून काही अंतरावर पोलिसांनी हा मोर्चा रोखला. त्यामुळे आंदोलक आणि पोलिसांमध्ये जोरदार धक्काबुक्की झाली. त्यानंतर मात्र, पोलिसांनी दहा जणांचे शिष्टमंडळ राज्यपालांच्या भेटीसाठी नेण्याची तयारी दर्शवली.
काँग्रेसने मोर्चा काढून राज्यपालांना भेटून निवेदन देणार असल्याचे अगोदरच जाहीर केले होते. त्यामुळे दोनापावल येथील राजभवनाचे प्रवेशद्वार आणि परिसरात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दोनापावल सर्कल येथे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, गोवा प्रदेश महिला काँग्रेस अध्यक्ष प्रतिमा कुतिन्हो, माजी आमदार आग्नेल फर्नांडिस, माजी महापौर सुरेंद्र फुर्तादो, उत्तर गोवा जिल्हाध्यक्ष विजय भिके, प्रवक्ते जनार्दन भंडारी, सुभाष केरकर यांच्यासह शेकडो काँग्रेस कार्यकर्ते मोर्चामध्ये सहभागी झाले होते.
केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा आहे. देशाची अर्थव्यवस्था ढासळली आहे. उद्योग बंद पडत आहेत. जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीवर नियंत्रण ठेवण्यास सरकार अपयशी ठरले आहे. मंदी असताना सरकार त्यावर काहीच उपाययोजना करताना दिसत नाही. तर देशभरात कायदा आणि सुव्यवस्था चिंताजनक बनली आहे. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. देशात विदेशी पर्यटक येतील की नाही, अशी शंका येऊ लागली आहे, असे विरोधी पक्षनेते दिगंबर कामत म्हणाले.
गोव्याची जीवनदायिनी असलेल्या 'म्हादई' नदीचा राजकारण्यांकडून सौदा सुरू आहे. राज्यपालांनी म्हादईबाबत गोव्यावर अन्याय होऊ देऊ नये. जर तसे झाले तर गोमंतकीय गप्प बसणार नाहीत, असेही कामत म्हणाले.
शांततेच्या मार्गाने मोर्चा काढत असताना गोवा पोलिसांनी राजभवनापासून दूर अडवला. पोलीसही सरकारच्या अधिन आहे, त्यांच्या पक्षपातीपणाचा काँग्रेस निषेध करते. तसेच गोव्यावरील कर्जाचा बोजा 20 हजार कोटींच्या वर गेला आहे. उद्योग बंद पडत असून बेरोजगारी वाढत आहे. यापुढे गोव्याचा आवाज दिल्लीत पोहचवण्यासाठी 14 डिसेंबरला दिल्लीतील रामलीला मैदानावर आंदोलन छेडले जाईल, असे गोवा काँग्रेसचे अध्यक्ष चोडणकर यांनी सांगितले.