पणजी - लैंगिक अत्याचार प्रकरणातील तेहलकाचे माजी संपादक तरुण तेजपाल यांची आज म्हापसा न्यायालयाने ठोस पुराव्याअभावी सुटका केली. शुक्रवारी म्हापसा येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश क्षमा जोशी यांनी हा निकाल दिला. तेजपाल याची मुलगी तारा हिने न्यायालयाच्या निकालाचे स्वागत केले. दरम्यान, या निकालाच्या विरोधात आम्ही लवकरात लवकर उच्च न्यायालयात दाद मागणार आहोत, असे गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले.
आज अंतिम सुनावणी -
या प्रकरणाचा निकाल 19 मेला जाहीर होणार होता. मात्र, या न्यायालयात वीज पुरवठ्याची समस्या असल्याने ती सुनावणी बुधवार 21 मेला सकाळी 10.30 पर्यंत तहकूब करण्यात आली होती. या अगोदर तेजपाल यांच्याविरोधात म्हापसा येथील न्यायालयात यक्तिवाद पूर्ण झाले होते. त्यावर 27 एप्रिलला निकाल दिला जाईल, असे स्पष्ट करण्यात आले होते. मात्र, त्यावेळी सुनावणी तहकूब करून 12 मे ही तारीख देण्यात आली. मात्र, कोविडमुळे न्यायालयात कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याचे कारण देऊन त्या दिवशी ती सुनावणी बुधवार 19 मेला सकाळी 10.30 पर्यंत तहकूब करीत असल्याचे न्या. क्षमा जोशी यांनी जाहीर केले होते.
या कलमांन्वये दाखल होता गुन्हा -
याप्रकरणी तेजपाल यांच्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या 376 (बलात्कार) 341, 342, 354 अ व 354ब या कलमांन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता. सहकारी तरुणीचे लैगिक शोषण केल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला होता. सुमारे सात वर्षांपूर्वी म्हणजे 2013मध्ये गोव्यात बांबोळी येथील एका तारांकित हॉटेलमध्ये झालेल्या ‘थिंक फेस्टिव्हल’च्या दरम्यान हे प्रकरण घडले होते. हे प्रकरण राष्ट्रीय पातळीवर बरेच गाजले होते. तरुण तेजपाल सध्या सशर्त जामिनावर होते.
सहकारी महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार -
तरुण तेजपाल यांनी एका सहकारी महिलेवर लैंगिक अत्याचार केला, अशी तक्रार पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. यानंतर ते प्रकरण अतिशय संवेदनशील, गंभीर स्वरुपाचे असल्याने हा तपास गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला होता. गुन्हे शाखेच्या तत्कालीन निरीक्षक तथा विद्यमान पोलीस उपअधीक्षक सुनिता सावंत यांनी त्या प्रकरणाचा तपास करून तेजपाल याच्याविरोधात आरोपपत्र सादर केले होते. न्यायालयाने 29 सप्टेंबर 2017ला त्यांच्याविरोधातील आरोपपत्र दाखल करून घेतले होते. या खटल्यावरील सुनावणी इन कॅमेरा घेण्यात आली होती. या खटल्यावरील सुनावणी लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावी, असे निर्देश यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्या अनुषंगाने मागच्या समारे सहा महिन्यांत ती सुनावणी तेजगतीने घेण्यात आली होती.
हेही वाचा - आरोग्य कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी भावूक
30 नोव्हेंबर 2013ला तेजपाल यांना अटक -
बलात्कार झाल्याची तक्रार सादर केल्यानंतर संशयिताला 30 नोव्हेंबर 2013ला अटक करण्यात आली होती व त्याला सुमारे सहा महिने कोठडीत राहावे लागले होते. या खटल्यावरील सुनावणीवेळी बचाव पक्षातर्फे चार जणांच्या साक्षी नोंदवल्या होत्या. तसेच, अन्य किमान 80 जणांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या होत्या. या प्रकरणाचा तपास सुरू असताना संशयिताने जिल्हा व सत्र न्यायालयात व उच्च न्यायालयातही जामिनासाठी अर्ज केला होता. अखेरीस खटल्याची सुनावणी प्राधान्यक्रमाने घेऊन पूर्ण करण्याचे निर्देश देत सर्वोच्च न्यायालयाने त्याला सशर्त जामीन दिला होता.
पीडित तरुणीचा उच्च न्यायालयात अर्ज -
सुनावणीवेळी संशयिताच्या वकिलांकडून उलटतपासणीवेळी अनेक प्रश्न विचारून स्वत:चे मानसिक संतुलन बिघडवण्याचा प्रयत्न झाले, असे नमूद करून पीडित तरुणीने उच्च न्यायालयात अर्ज सादर केला होता. सुमारे एक महिन्याहून अधिक काळ तिची ही उलटतपासणी सुरू होती. घटनेशी संबंधित नसलेल्या प्रश्नांचा भडीमार उलटतपासणीवेळी केल्याने तिने तो अर्ज केला होता.
तेजपाल यांच्या मुलीकडून निकालाचे स्वागत -
यावेळी तरुण तेजपाल यांची मुलगी तारा तेजपाल हिने माध्यमांसमोर प्रकरणाच्या निकालाची प्रत वाचून दाखवली. तसेच यावेळी तिने न्यायालयाचे आभारही मानले. आपल्या वडिलांवर खोटे आरोप करून त्यांना या प्रकरणात अडकविण्यात आले होते. मात्र, आज न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता करून आम्हाला न्याय दिला आहे, अशी प्रतिक्रिया तारा यांनी दिली.
आम्ही उच्च न्यायालयात जाणार - मुख्यमंत्री
दरम्यान, या प्रकरणात न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, न्यायालयाने तरुण तेजपाल यांना निर्दोष मुक्त केले असले तरी एका महिलेवर अन्याय झाला आहे. यामुळे निकालाच्या विरोधात आम्ही लवकरात लवकर उच्च न्यायालयात दाद मागणार आहोत, असे माहिती त्यांनी दिली. पणजी येथे पत्रकार परिषदेत बोलताना डॉ. सावंत म्हणाले, त्या प्रकरणात सर्व ठोस पुरावे उपलब्ध असताना एका महिलेवर झालेला अन्याय गोवा राज्यात सहन केला जाणार नाही. त्यामुळे, लवकरात लवकर उच्च न्यायालयात याचिका सादर करण्याची तयारी आम्ही सुरू केली आहे. या प्रकरणी संशयिताच्या विरोधात ठोस पुरावे असल्यामुळे तो संशयित या प्रकरणातून सुटूच शकत नाही, असा दावाही यावेळी मुख्यमंत्री सावंत यांनी केला.
हेही वाचा - ट्रॅक्टर रॅली हिंसाचार प्रकरणी आरोपपत्र दाखल; दीप सिद्धूसह 16 जण आरोपी