पणजी - हवामानाने साथ दिली तर सोमवारी सकाळपासून दोनापावल येथे अडकलेल्या जहाजावरील नाफ्ता खाली करण्यास सुरुवात केली जाईल आणि हा नाफ्ता दुसऱ्या बार्जमधील टँकरमध्ये भरून हालविला जाईल, अशी माहिती गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.
हेही वाचा - दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी सरकार कटीबद्ध - रामदास आठवले
'नू शी नलीनी' हे मानवरहित जहाज पणजीजवळील दोनापावल समुद्रात खडकावर अडकले आहे. त्यामुळे परिसरातील ग्रामस्थ आणि मच्छीमारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. शुक्रवारी या जहाजावरील नाफ्ता हलविण्यासाठी नौदलाने प्रयत्न केले होते. मात्र, त्यासाठी मुंबईहून आणलेला हायड्रोलिक पंप एअरक्राफ्टद्वारे जहाजावर उतरवत असताना समुद्रात पडला. त्यामुळे ही कार्यवाही स्थगित करण्यात आली होती. दुसरीकडे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून सरकारने हे जहाज तत्काळ हटवावे, अशी मागणी मागील दोन दिवसांपासून नागरिकांनी लावून धरली आहे.
याप्रकरणी डॉ. सावंत म्हणाले, 'दोनापावल समुद्रात खडकावर अडकलेले जहाज सुरक्षित आहे. आता नवा हायड्रोलिक पंप आणण्यात आला आहे. त्यामुळे हवामामाने साथ दिल्यास सोमवारी सकाळी सदर जहाजातील नाफ्ता हलविण्यास सुरूवात केली जाईल. तो नाफ्ता टँकर असलेल्या बार्जमध्ये हालविण्यात येईल. येथील ग्रामस्थांची भीती अनाठायी आहे. यासाठी बंदर विभागाबरोबरच केंद्रीय गृहमंत्रालयही लक्ष ठेऊन आहे. ग्रामस्थांच्या सुरक्षेकडेही लक्ष देण्यात आले आहे.'
दरम्यान, म्हादई प्रश्नावर सोमवारी केंद्रीय वन, पर्यावरण आणि हवामान बदल खात्याचे मंत्री प्रकाश जावडेकर यांची भेट घेण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळ दिल्लीत घेऊन जाणार आहे, असे सावंत म्हणाले. यापूर्वी सदर जावडेकर यांच्याशी माझे बोलणे झाले असून आपल्याला गोव्याचे हित माहित असल्याचे त्यांनी सांगितले आहे.