पणजी : कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी गोवा बोर्डातर्फे घेण्यात येणाऱ्या 10 वी आणि 12 वी इयत्तेच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. परंतु, कोरोना विषाणूवर यशस्वी मात करत गोव्याने ग्रीन झोनमध्ये प्रवेश केल्यामुळे आता परीक्षा मे महिन्यातच घेण्यात येणार आहेत. 12 वीची परीक्षा 20 मेपासून तर, 10 वीची परीक्षा 21 मेपासून घेतली जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बुधवारी केली.
मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी माध्यमाच्या प्रतिनिधींशी बोलताना म्हणाले, राज्य कार्यकारी समितीने काही अटींवर परीक्षा घेण्यास मान्यता दिली आहे. त्याबरोबरच केंद्रीय गृह मंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शन तत्वांचे पालन करुनच परीक्षा घेतली जाईल. केंद्र सरकारने विदेशातील भारतीयांना परत आणण्याचा निर्णय घेतला, त्याचे स्वागतच करतो. यामुळे 3 हजार 100 हुन अधिक गोमंतकियांबरोबरच भारतीय मोठ्या संख्येने मायदेशी परततील. परंतु, ओसीआय कार्डधारकांबाबत अद्याप काही निर्णय झालेला नाही. तर, देशाच्या विविध राज्यातून गोव्यात परतण्यासाठी 4 हजार 500 हुन अधिक गोमंतकियांनी ऑनलाइन अर्ज भरले आहेत. जेव्हा गोव्यातून एखादी बस परराज्यात जाते तेव्हा येताना अशा गोमंतकियांना आणले जाते. त्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधला जातो. तसेच याची माहिती समाजमाध्यमातून दिली जात आहे. ही वाहने पाठवताना कर्मचाऱ्यांची तपासणी केली जात नाही. परंतु, तेथे गेल्यानंतर बस धुवून स्वच्छ केली जाते. तसेच खाजगी वाहनांद्वारे येऊ शकतात. येथे आल्यानंतर तपासणी करून त्यांना होम क्वारंटाईन केले जाईल. गोवा ग्रीन झोनमध्ये असल्याने तो तसाच राखण्यासाठी गोमंतकीयांनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले. आता जे मजूर आपल्या राज्यात जाऊ इच्छितात त्यांना येथेच ठेवण्यासाठी सरकारबरोबर उद्योग आणि आर्थिक क्षेत्राशी संबंधित सर्वांनी याचा विचार करावा.
गोव्यातून आपल्या राज्यात परतण्यासाठी 8 हजारांहून अधिक मजुरांनी नोंदणी केली आहे. ज्यांना त्यांच्या राज्याच्या सीमेवर गोवा सरकार सोडण्याची व्यवस्था करणार आहे. तर, रेल्वेच्या माध्यमातून जाणाऱ्यांसाठी केंद्र सरकार आणि रेल्वे मंत्रालयाच्या आदेशानंतर पावले उचलली जातील. असे सांगून मुख्यमंत्री सावंत म्हणाले, गोव्यात 3 एप्रिलपासून एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडलेला नाही. तर, आतापर्यंत 3 हजारांहून अधिक चाचण्या करण्यात आल्या आहेत.
आयआयटीसाठी जागेचे हस्तांतरण
गोवा आयआयटीला स्वतःच्या जागेत सुरुवात करता यावी यासाठी गोवा सरकारतर्फे उत्तर गोव्यातील गुळेली येथे 10 लाख चौरस मीटर जागा हस्तांतरित करण्यात आली असून यासाठी आज करारावर सह्या करण्यात आल्या आहेत. जागा हस्तांतरित केल्यानंतर पुढील दोन वर्षात आयआयटी कँम्पस तयार करणार आहे, असे सावंत म्हणाले.