पणजी - कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार बंद करण्यात आले आहेत. याचा परिणाम गोव्यातील पर्यटन व्यवसायावरही झाला आहे. पर्यटकांनी फुललेले बीच सध्या ओस पडले आहेत. मात्र, या बीचवर जीवनरक्षक म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुटी मिळालेली नाही.
पावसाळ्यात जशी परिस्थिती असते, तशी परिस्थिती सध्या गोव्यातील सर्व बीचची झालेली आहे. एखाद दुसरा व्यक्ति आणि काही तुरळक विक्रेतेच बीचवर दिसतात. मात्र, काहीही आपात्कालीन परिस्थिती उद्भवू शकते त्यामुळे जीवनरक्षकांना बीचवर हजर रहावेच लागत आहे, असे कळंगुट-बागा बीचवर काम करणाऱ्या शशिकांत जाधव यांनी सांगितले.
लॉकडाऊन जरी असला तरी अद्यापही बीचवर अनेक लोकांचे दैनंदिन जीवन अवलंबून आहे. माच्छीमार, किरकोळ विक्रेते, बीच लगतच्या भागात लॉकडाऊनमुळे अडकलेले पर्यटक हे सर्व फेरफटका मारण्यासाठी येतातच. त्यामुळे जीवनरक्षक कायम बीचवर तैनात ठेवावेच लागतात, अशी माहिती 'दृष्टी मरीन' या खासगी सुरक्षा संस्थेच्या कार्यकारी संचालक असलेल्या रवि शंकर यांनी दिली.
जागतिक आरोग्य संघटना आणि गोवा आरोग्य विभागाने दिलेल्या सुचनांप्रमाणे सर्व जीवनरक्षकांना मार्गदर्शन करण्यात आले आहे. सर्वांना सॅनिटायझर, मास्क, साबण, हॅन्डवॉशचे वितरण करण्यात आले असल्याचे शंकर यांनी सांगितले.