पणजी - आगामी गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज सकाळपासून गोव्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. तृणमुल काँग्रेस आणि महाराष्ट्र गोमंतक पक्षाने युती केल्यावर भाजपच्या गोटात 'एकला चलो' चा नारा देण्यात आला आहे.
पणजीतील विवंता हॉटेलमध्ये निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री किशन जे. रेड्डी, सी.टी. रवी, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांची महत्वाची बैठक सुरू झाली आहे. या बैठकीत उमेदवार निश्चित करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. या एक दोन दिवसांत भाजपा उमेदवारांची पहिली यादी घोषित करण्यात येणार असल्याचेही बोलले जातेय.
एकीकडे भाजपा उमेदवार निश्चित करत असताना तृणमुल काँग्रेस आणि महाराष्ट्र गोमंतक पक्षाने आपल्या युतीवर शिक्कामोर्तब केले आहे. मगोचे नेते दीपक ढवळीकर यांनी युतीचा प्रस्ताव तृणमूल काँग्रेसला दिल्यावर त्यांनी याचा स्वीकार करत याविषयीची अधिकृत घोषणा आज पत्रकार परिषदेत केली. दरम्यान तृणमूलच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी 13 डिसेंबरला गोव्यात दाखल होणार असून दोन्ही पक्षाच्या वतीने यावर अधिकृतपणे शिक्कामोर्तब करण्यात येणार आहे.