पणजी - समुद्रातील प्रत्येक घटनेची दक्षता घेण्यासाठी भारतीय तटरक्षक दल सज्ज आहे. आपत्कालीन स्थितीमध्ये जीवाची सुटका कशी केली जाते, याची प्रात्यक्षिके भारतीय तटरक्षक दलाने सागरी आणि हवाई यंत्रणेच्या सहाय्याने सारेक्स 2020 मधील 'हम्सा' सादर केले.
मुरगाव बंदर क्षेत्राच्या हद्दीत पार पडलेल्या या सादरीकरणात तटरक्षक दलाबरोबरच भारतीय नौदल, सागरी पोलीस, हवाई उड्डाण प्राधिकरण आदींसह नॅशनल मेरिटाईमशी संलग्न असलेल्या 31 विविध संस्था आणि गोवा सरकारने सहभाग घेतला होता.
तटरक्षक दलाने आयोजित केलेल्या 'रेस्क्यू ऑपरेशन' ने प्रत्यक्ष आपत्कालीन वेळी कशाप्रकारे जीवरक्षक यंत्रणा राबविण्यात येते, याचे प्रात्यक्षिक सादर केले. ज्यामध्ये नौदल आणि तटरक्षक दलाचे पोलीस यांच्यासह विविध सुरक्षा यंत्रणा सहभागी झाल्या होत्या. ज्यामुळे त्यांचे प्रत्यक्ष कार्य कशाप्रकारे चालते हे कळून आले.
ऑपरेशन 'सारेक्स 2020' दक्षिण गोव्यातील मुरगाव बंदर क्षेत्रातील खोल अरबीसमुद्रात सुमारे दोन तासांहून अधिक काळ सुरू होते. नॅशनल मेरिटाईम सेक्युरिटी अँड रेस्क्यू एक्सरसाईज (सारेक्स) चे हे 9 वे वर्ष आहे. यासाठी 'हम्सा' हे सांकेतिक नाव देण्यात आले आहे. सागरी आणि हवाई रेस्क्यू ऑपरेशनचे एकत्रित प्रात्यक्षिक सादर करण्याची ही देशातील पहिलीच वेळ आहे, असे माध्यमांना माहिती देताना भारतीय तटरक्ष दलाचे महासंचालक के. नटराजन म्हणाले.
भारत सरकारने 2009 मध्ये भारतीय तटरक्षक दलाला अधिक सक्षम करताना एरोनॉटिकल आणि मेरिटाईम बोर्डाचे कायम सदस्यत्व दिले आहे. भारतीय तटरक्षक दल आपल्या हद्दीतील अथवा आंतरराष्ट्रीय सीमेवरील संकटात सापडलेल्या जीवांचे रक्षण करण्यासाठी नेहमीच तत्पर असते. भारताच्या सभोवताली असणाऱ्या 4.6 चौरस दक्षलक्ष किलोमीटर सागरी क्षेत्रावर लक्ष ठेवून आपत्कालासाठी दल सज्ज आहे.
संकटात सापडलेल्यांना आवश्यक प्राथमिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तटरक्षक दल सज्ज असते. मागच्या वर्षी म्हणजे 2019 मध्ये दलाने 400 जणांचे प्राण वाचविले आहेत. तर 1978 पासून आतापर्यंत 9, 701 जणांच्या जीवाचे रक्षण केले आहे, असेही नटराजन यांनी सांगितले.
आज करण्यात आलेले प्रात्यक्षिक हे संरक्षण, नागरी हवाई उड्डाण आणि जहाज बांधणी मंत्रालय यांचा संयुक्त उपक्रम होता. याच्या सादरीकरणात 31 विविध संरक्षण संस्थांनी सहभाग घेतला होता. तसेच याकरिता 6 जहाजे, 2 इंटरसेप्टर, 1 पॅसेंजर बोट, मुरगाव पत्तन न्यासाचे जहाज टग, बी-17 हे अत्यावश्यक हेलिकॉप्टर तसेच नौदालाची हेलिकॉप्टर आणि इस्रो यांची मदत घेण्यात आली होती.
सागरी जीवांना त्रास होऊ नये यासाठी पहिल्यांदाच ऑपरेशनसाठी परावर्तित होणारा हिरवा रंग वापरण्यात आला होता. दरम्यान, सागरी संशोधन आणि त्यासमोरील आव्हाने यावर विचार विनीमय करण्यासाठी दि. 5 ते 7 मार्च दरम्यान सारेक्स 2020 चे गोव्यात आयोजन केले आहे.