पणजी - सनातन फायनान्सर आणि रियल इस्टेटचे प्रवर्तक अंकित कुमार आणि सुनिल कुमार यांच्यावर गुंतवणुकदारांकडून (परकीय गुंतवणुकदारांचाही समावेश) तक्रार दाखल करण्यात आली होती. दक्षिण गोव्यातील 56 फ्लॅट आणि 16 बंगल्याच्या रियल इस्टेट प्रकल्पातील या दोन्ही प्रवर्तकांच्या गैरप्रकरणावरून (मनी लॉंडरिंग) शनिवारी सक्तवसुली संचालनालयाकडून त्यांच्या बँक खात्याविषयी चौकशी केली.
गोवा पोलिसांनी अंकित कुमार आणि सुनिल कुमार यांच्यावर कलम 120 ब गुन्हेगारी स्वरुपाचा कट आणि कलम 420 फसवणूक या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. प्रवर्तक अंकित कुमार आणि सुनिल कुमार यांना परदेशातील गुंतवणूकदारांकडून एफडीआयच्या माध्यमातून पैसे पाठवण्यात आले होते. यामध्ये 7 कोटी 73 लाख रुपयांची गुंतवणूक करण्यात आली होती. असे ईडीने म्हटले आहे.
गोव्यातील 'पीस व्हॅली' प्रकल्पातील फ्लॅट किंवा बंगला खरेदी करण्यासाठी अंकित कुमार आणि सुनील कुमार यांनी स्थापन केलेल्या शेल फर्ममध्ये गुंतवणूक करण्याचे आमिष परदेशी नागरिकांना देण्यात आले होते. तसेच या फ्लॅट्स किंवा बंगल्याची मालकी परदेशी नागरिकांना हस्तांतरित केली नव्हती, असे ईडीने म्हटले आहे.