पणजी - गोवा माईल्समुळे टुरिस्ट टॅक्सीधारक गोमंतकियांच्या रोजगारावर गदा येण्यास सुरुवात झालेली आहे. त्यामुळे सरकारने हे अॅप रद्द करावे आणि लोकहिताचा निर्णय घ्यावा, अशी मागणी नॉर्थ गोवा टँक्सी असोसिएशने केली आहे.
उत्तर गोव्यातील कळंगुट येथील एका हॉटेलमध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अध्यक्ष वासुदेव आर्लेकर, उपाध्यक्ष रवींद्र वेंगुर्लेकर, सच्चित कोरगावकर, राजेश कांदोळकर, बाप्पा कोरगावर आदींसह संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना आर्लेकर म्हणाले, टॅक्सी व्यवसाय हा स्वयंरोजगार म्हणून पारंपरिक पद्धतीने आम्ही करत आहोत. अशावेळी गोवा माईल्सचा दर पाहिला आणि पेट्रोलचा दर पाहिला तर गोव्यातील मोटरसायकल पायलटला देखील तो परवडणारा नाही. या व्यवसायात 22 हजार टॅक्सीचालक आहे. केवळ दोन मंत्र्यांकडून होणाऱ्या दिशाभुलीला बळी पडून मुख्यमंत्र्यांनी 30 हजार गोमंतकियांना संपवू नये. गोव्यातील टॅक्सीचालक सरकारने 2013 मध्ये ठरवलेल्या दराप्रमाणे आजही टँक्सी सेवा देत आहेत.
तर टॅव्हल अँड टुरिझम असोसिएशन ऑफ गोवा यांच्याकडून होणाऱ्या अहवेलनवर टीका करताना आर्लेकर म्हणाले, कोणत्या टॅक्सीचालकाने जबरदस्तीने पर्यटकांना लुटले हे सांगावे. उलट टीटीएजीच्या धोरणामुळे 60 टक्के विदेशी पर्यटकांनी गोव्यात येणे सोडून दिले आहे. आम्ही गोव्याचे भुमिपुत्र असून पर्यटकांशी नेहमीच सौजन्याने वागत आलो आहोत. टीटीएजी मंत्र्यांना चुकिची माहिती देत आहे.
अनेकदा सरकारी कर्मचारीही टॅक्सी चालवत असतात. त्यामुळे टॅक्सीचालकांसाठी बँच सक्तीचा करावा. जर सरकारला आमचा टँक्सी दर अधिक वाटत असेल तर आम्हाला सरकारी सेवेत सामावून घ्यावे. आम्ही पाचव्या वेतन आयोगाप्रमाणेच वेतन घेऊन, असेही आर्लेकर यांनी सांगितले.
दरम्यान, गोव्यातील पारंपरिक पद्धतीने टॅक्सी व्यवसाय करणाऱ्या सर्वच संघटनांनी गोवा माईल्स ही अॅपबेस्ड टॅक्सी सेवा रद्द करावी, अशी मागणी मागील अनेक दिवसांपासून लावून धरली आहे.