पणजी- गोवा सरकारने राज्याच्या पर्यटन हिताचा विचार करून 'गोवा माईल्स' या अॅपबेस्ड टॅक्सी सेवा उपक्रम सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. गोवा माईल्स टॅक्सी सरकारने त्वरित बंद कराव्यात अन्यथा गोवा बंद करण्याचा इशारा स्थानिक टॅक्सी चालकांनी सरकारला दिला होता. त्यामुळे स्थानिक टॅक्सी चालकांच्या दबावापुढे न झुकता ही सेवा खंडित केली जाणार नाही, अशी माहिती गोवा पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष आमदार दयानंद सोपटे यांनी दिली.
पणजीतील पर्यटन भवनात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना सोपटे बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले, गोवा माईल्सला येत्या ऑगस्ट महिन्यात 1 वर्ष पूर्ण होत आहे. याला विरोध करण्याऐवजी ज्यांनी यामध्ये सहभाग घेतला नाही, अशांनी यामध्ये सहभागी होत आपला व्यवसाय वाढवावा, असे सोपटे म्हणाले.
काही टॅक्सीचालक गोवा माईल्सवर अज्ञानापोटी बिनबुडाचे आरोप करत आहेत. कारण त्यांचे काही सहकारी गोवा माईल्सच्या माध्यमातून चांगली कमाई करत आहेत. ऑगस्ट 2018 मध्ये केवळ यामध्ये 55 टक्सी सहभागी होत्या. तर आज ही संख्या 1 हजार 400 च्या वर गेली आहे. पहिल्या महिन्यात 1 हजार 500 फेऱ्या करणाऱ्या या टॅक्सी सेवेने डिसेंबर 2018 मध्ये 14 हजार फेऱ्या पूर्ण केल्या आहेत. तर जून 2019 मध्ये आतापर्यंत 19 हजार फेऱ्या पूर्ण केल्या आहेत. यामाध्यमातून सरकारला 70 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. तसेच स्थानिकांना रोजगार मिळला असल्याचे सोपटे यांनी सांगितले.