पणजी - कोरोनामुक्त गोव्याला स्वयंपुर्णतेकडे कसे घेऊन जाता येईल याविषयी विविध माध्यामातून सर्व्हे सुरु आहे. जून अखेरीस हे अहवाल प्राप्त होतील. ज्यामुळे हरीतक्रांती, धवलक्रांती आणि नीलक्रांती, उद्योग याविषयी धोरण निश्चित करता येईल. या संकटाच्या काळातून गोवा स्वयंपुर्णतेकडे जाईल आणि यासाठी गोमंतकीय सहकार्य करतील, असा विश्वास गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला.
गोवा राज्य सध्या कोरोनामुक्त आहे. परंतु, लॉकडाऊन सुरुच आहे. अशावेळी हरित विभागात असलेला गोवा कायम कोरोनामुक्त ठेवण्यासाठी काय करता येईल, सरकार काय करत आहे याविषयी डॉ. सावंत यांनी फेसबुकच्या माध्यमातून गोमंतकीयांशी संवाद साधला. तसेच त्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. डॉ. सावंत म्हणाले, गोव्याची अर्थव्यवस्था पुर्वपदावर आणण्यासाठी चौथ्या लॉकडाऊनमध्ये केंद्राने राज्यांना काही निर्णय घेण्यास मुभा दिली आहे. यानुसार गोव्याची आर्थिक स्थिती डोळ्यासमोर ठेवून निर्णय घेतला जाईल.
या काळात लोकांना जीवनशैलीत बदल करावे लागतील. तसेच पुढील 2 वर्षे सावध राहावे लागेल. गोमंतकीयांना काही क्षेत्रात संधी आहे. त्याचा लाभ त्यांनी घेतला पाहिजे. सरकारने नियुक्त केलेल्या समितीचा आर्थिक अहवाल प्राप्त होताच, त्याचा अभ्यास केला जाणार आहे. गोव्यातील दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेण्याचा निर्णय गोवा बोर्ड, शिक्षण संचालनालय, राज्य कार्यकारी समिती यांनी घेतला असून गृहमंत्रालयाची परवानगीही घेतली आहे.
गोव्यात पर्यटक यावेत अशी आमची इच्छा आहे. त्यांच्या स्वागतास आम्ही तयार आहोत. परंतु, यासाठी काही काळ थांबावे लागेल. याविषयी मार्गदर्शक तत्वे लवकरच जाहीर केली जाणार आहेत. यावर्षी आतापर्यंत शेतीची कामे 95 टक्के पूर्ण झाली आहेत. पहिल्यांदाच परराज्यातील व्यक्तींच्या मदतीशिवाय गोव्यातील शेतकऱ्यांनी आपण हे करु शकतो हे सिद्ध केले आहे. आम्हाला स्वयंपूर्ण होण्यासाठी अशी कामे स्वतः करावी लागतील, असे डॉ. सावंत म्हणाले.
कोरोनामुळे गोव्यात एकाचा मृत्यू झाल्याची अफवा अनेकदा पसरविण्यात आली आहे. आपात्कालीन कायदा लागू असताना कोणीही अशा अफवा पसरवू नये, असे ते म्हणाले. तर देशात आणि विदेशात अडकलेल्या गोमंतकीयांना परत आणण्यासाठी सरकार काय उपयोजना करत आहे, याची माहिती सावंत यांनी दिली. परराष्ट्र व्यवहार खात्याशी याबाबत वारंवार संपर्क साधला जात आहे. यासाठी प्रक्रिया निश्चित करण्यात आली असून खात्याची परवानगी मिळताच विदेशातील गोमंतकीयांना घेऊन येणारे विमान पुढील आठवड्यात येऊ शकते. देशात विविध ठिकाणी अडकलेल्यांपैकी आतापर्यंत 3 हजार जणांना राज्यात प्रवेश देण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
गोमंतकीय खलाशांबाबत सरकार प्रयत्न करत आहे. आतापर्यंत 60 खलाशांना परत आणले आहे. तर 5 जूनपर्यंत सुमारे 800 गोमंतकीयांना घेऊन कार्निव्हाल जहाज येणार आहे. तसेच आणखी दोन जहाजे मुंबई अथवा मुरगाव बंदरात दाखल होतील, असेही त्यांनी सांगितले. गोव्यातून विदेशी नागरिकांना सुखरूप मायदेशी परत पाठवण्यात आले आहे. यावर बोलताना डॉ. सावंत म्हणाले, देशभरातून 14 हजार विदेशी पर्यटक मायदेशी गेले. तर केवळ गोव्यातून 7 हजार पर्यटकांना मायदेशी पाठविण्यात आले. परंतु, तत्पूर्वी येथे असलेल्या पर्यटकांची पुरेशी काळजी घेत आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या.