पणजी - कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी लोकांनी सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करणे आवश्यक आहे. दुसरी लाट रोखणे लोकांच्या हाती आहे. परंतु, आलीच तर त्याला आळा घालण्यासाठी आमची पूर्वीपेक्षा चांगली तयारी आहे. आमच्याकडे पुरेशा खाटा आणि व्हेंटिलेटर उपलब्ध आहे, असे गोवा वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवानंद बांदेकर यांनी आज सांगितले.
गोव्याची आरोग्य यंत्रणा सक्षम-
गोमेकॉ येथे माध्यमांशी बोलताना डॉ. बांदेकर म्हणाले, गोव्याच्या शेजारील राज्यांमध्ये काही ठिकाणी कोरोना प्रादूर्भाव वाढत असल्याने लॉकडाऊन करण्याची शक्यता असल्याचे ऐकण्यात आले आहे. परंतु, गोवा हे पर्यटन स्थळ असल्याने आम्ही कोणाला रोखू शकत नाही. मात्र, महाराष्ट्र अथवा कर्नाटकात गेल्यावर आमच्याकडे जशाप्रकारे 48 तासांतील आरटीपीसीआर चाचणी प्रमाणपत्र मागतात त्याप्रमाणे जर सरकारने मागितले तर पॉझिटीव्ह रुग्ण येण्याचे थांबेल. कदाचित दुसरी लाट आली तर ती रोखण्यासाठी गोव्याची आरोग्य यंत्रणा सक्षम आहे. सध्या आमच्याकडे उपलब्ध खाटांपैकी केवळ एकदशांश उपयोगात आणल्या गेल्या आहेत. तसेच व्हेंटिलेटरही पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत.
गोव्यात आतापर्यंत 65 टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. जे फ्रन्टलाईन वर्कर आहेत. त्यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत लस दिली जाते. त्याची नोंदणी त्यांच्याकडे असते, असे सांगून डॉ. बांदेकर म्हणाले, लसीकरण ऐच्छिक आहे. त्यामुळे कुणावरही सक्ती करता येत नाही. तसेच सर्वसामान्य जनतेला कधी उपलब्ध होईल, हे केंद्र सरकार सांगेल.
झिरो कोविड रुग्ण हे लक्ष-
कोविडमुळे मागील वर्षभर लोक घाबरून गेले आहेत. परंतु, घाबरून किती दिवस राहणार?, असा सवाल उपस्थित करत डॉ. बांदेकर म्हणाले, कोरोनासोबत जगण्यास शिकले पाहिजे. मात्र, त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करणे आवश्यक आहे. तसेच नवी रुग्णसंख्या कमी-जास्त का होते. हे सांगणे कठीण आहे. सर्वांसाठी लसही उपलब्ध होईल. परंतु तोपर्यंत कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मास्क, सँनिटायझर आणि शारीरिक अंतर कटाक्षाने पाळले पाहिजे. कोरोनाचे 'झिरो' रुग्ण हे माझे स्वप्न असून तो दिवसही नक्की येईल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.
हेही वाचा- राज्यात भरती प्रक्रिया आणि स्पर्धा परीक्षा 1 एप्रिल नंतर घ्या; विनायक मेटेंची मागणी