पणजी - गोव्यातील निवडणूक अधिकारी सत्ताधारी पक्षाच्या प्रभावाखाली आहेत. तक्रार दाखल करून २० दिवस झाले तरीही निवडणूक अधिकाऱ्यांनी काहीच उत्तर दिलेले नाही. उलट भाजप हे विरोधकांना धाक दाखवित आहे, असा आरोप गोवा प्रदेशचे प्रवक्ते ट्रॅजेनो डिमेलो यांनी केला. ते काँग्रेस भवनातील आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. भाजप सरकार हे संविधानात्मक संस्था संपवित असल्याचाही आरोप त्यांनी यावेळी केला.
गोव्यात स्वतंत्र आणि भयमुक्त वातावरणात निवडणूक होत आहे, असे जाणवत नसल्याचे ट्रोजन डिमेलो म्हणाले. आचारसंहिता लागू झाल्यानंतरही भाजप आघाडी सरकारने दोन उपमुख्यमंत्री नियुक्त केल्याची लेखी तक्रार ही निवडणूक अधिकाऱ्यांकडे दिली होती. परंतु, अद्याप उत्तर देण्यात आलेले नाही. त्यामुळे ती नियुक्ती बेकायदा असल्याचे स्पष्ट होते. खरेतर त्याबाबत निवडणूक अधिकाऱ्यांनी स्वत:हून दखल घ्यायला हवी होती, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
जाहीरनाम्यावरही साधला निशाणा-
भाजपने जाहीर केलेल्या निवडणूक जाहीरनाम्यावर त्यांनी टीका केली. ते म्हणाले, की भाजपचा निवडणूक जाहीरनामा हा एक 'जुमला' असल्याचे त्यांचे नेतेच सांगतात. यापूर्वी त्यांनी दरवर्षी २ कोटी तरुणांना रोजगार देणार असे सांगितले होते. उलट ते सत्तेवर आल्यानंतर ४ कोटी ७० लाख लोकांवर बेरोजगारीची वेळ आली आहे. संरक्षण मंत्रालय म्हणजे वडिलोपार्जित मालमत्ता असल्यासारखे भाजप वागत आहे.
गोव्यातील भाजपमध्ये निराशा - काँग्रेस प्रवक्ता
गोव्यातील भाजपमध्ये आता स्पष्टपणे निराशा जाणवत आहे. मुख्यमंत्र्यांनी आपला राजकीय समतोल गमावला आहे. त्यामुळे ते कोणतीही वक्तव्ये करत असल्याची टीका डिमेलो यांनी मुख्यमंत्र्यांवर केली. लोकसभेच्या दोन्ही आणि विधानसभा पोटनिवडणुकीच्या तीनही जागा जिंकू, असा त्यांनी विश्वास व्यक्त केला.