पणजी - स्वातंत्र्य दिनी मुख्यमंत्र्यांनी ध्वजारोहण कार्यक्रमातील भाषणात स्वयंपूर्ण गोव्याचा नारा देत राज्याला प्रत्येक क्षेत्रात स्वयंपूर्ण करण्याचा मानस व्यक्त केला आहे. तसेच राज्याला पुढे नेण्यासाठी जनतेने साथ द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. गोव्याला पोर्तुगीजांच्या पारतंत्र्यातून मुक्त होऊन ६० वर्षे पूर्ण झाली आहेत. या ६० वर्षात राज्याने थोडी थोडी प्रगती केली. पण राज्याला आता प्रत्येक क्षेत्रात स्वयंपूर्ण बनवायचे आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आपल्या भाषणात सांगितले.
देशात पर्यटनात राज्य नंबर एकवर -
कोविड काळातही वर्ल्ड ट्रॅव्हल अँड टुरिझमचा सेफ ट्रॅव्हल्स हा किताब जिंकणारे गोवा हे एकमेव राज्य आहे. तसेच जुलै 2020 ते मार्च 2021 या कोविड काळातही राज्यात 32 लाख देशी, तर 30 हजारांच्यावर विदेशी पर्यटकांनी गोव्यात हजेरी लावत राज्य हे पर्यटनाच्या बाबतीत देशात एक नंबरवर असल्याचे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले.
या प्रकल्पाचे ऑक्टोबरमध्ये होणार लोकार्पण -
येत्या ऑक्टोबर महिन्यात राज्याला स्वातंत्र्य होऊन ६० वर्ष पूर्ण होणार आहेत. त्यामित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राज्याच्या दौऱ्यावर येणार असून त्यांच्या उपस्थित नूतनीकरण करण्यात आलेल्या अगवाद किल्ला, दक्षिण गोव्यातील जिल्हा रुग्णालय तसेच झुआरी नदीवरील सागरी सेतूच्या एका मार्गिकेचे लोकार्पण होणार आहे.
मोपा विमानतळाचे काम ३५ टक्के पूर्ण -
राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचे असणाऱ्या मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे ३५ टक्के काम पूर्ण झाले आहे. ७५ व्या स्वातंत्र्यदिनी हा विमानतळ राष्ट्राच्या सेवेसाठी तयार होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते त्याचे लोकार्पण केले जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री सावंत यांनी दिली.
मुख्यमंत्र्याच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे आणि घोषणा -
- राज्यात १ सप्टेंबर पासून घरगुती वापराचे पाणी मोफत
- पूरग्रस्तांना नवीन घर बांधण्यासाठी ४ लाखांची मदत
- किरकोळ नुकसान झालेल्याना पन्नास हजार ते एक लाखापर्यंत मदत
- कोविड मृत्यूधारकांच्या वारसांना 2 लाखाची मदत
- दीनदयाळ स्वस्थ योजनेअंतर्गत कोविड रुग्णांना मोफत उपचार
- दीनदयाळ स्वस्थ योजनेअंतर्गत अडीच लाख ते चार लाखाचा मोफत विमा
- केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री गरीब कल्याण तसेच प्रधानमंत्री किसान योजनेचा नागरिकांना आणि शेतकऱ्यांना मदत
- घराघरात जलसिंचन योजना राबविणार
- बंद खाणीचे ऑडिट करून त्यांचा लिलाव करणार
- खाणी पुन्हा सुरू करण्यासाठी खाण महामंडळ स्थापन करणार
- शेती, पशुपालन, दूध तसेच शेतीपूरक उद्योगांसाठी विशेष पॅकेज
- ग्रामपंचायतींना सशक्त करण्यासाठी ५०लाखांचा निधी तसेच ग्रामपंचायत क्षेत्रात विशेष प्रकल्प राबविण्यासाठी एक कोटींचा विशेष निधी
हेही वाचा - #IndiaAt75 : 'सबका साथ-सबका विश्वास, यासोबतच आता 'सबका प्रयास'; मोदींचा नवा नारा