पणजी : गोव्यातीर पारंपरिक उद्योग बंद पडत आहेत. अशावेळी संघर्ष करत असलेले टँक्सीचालक हे गोमंतकिय आहेत, याचा विचार करून सर्वांना विचारात घेऊन सरकारने निर्णय घ्यावा, अशी मागणी गोवा विधानसभेचे विरोधी पक्षनेते चंद्रकांत (बाबू) कवळेकर यांनी केली.
विधानसभेतील विरोधी पक्षनेत्यांच्या दालनात आयोजित पत्रकार परिषदेसाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार प्रतापसिंह राणे, फ्रान्सिस सिल्वेरा आणि विल्फ्रेड डिसा आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना कवळेकर म्हणाले, मागील अनेक दिवसांपासून गोमंतकिय टॅक्सीचालक आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत. यासाठी सोमवारी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी टँक्सीचालकांसोबत बैठक बोलावली होती. यावेळी सर्वपक्षीय आमदारांना विश्वासात घेण्यात आले नाही. परंतु, टँक्सीचालकांच्या मागणीचा विचार करता गोव्यात रोजगार निर्मिती करणारे पारंपरिक उद्योग बंद होत आहेत. याचा विचार करत टँक्सीचालकांना विश्वासात घेऊन तोडगा काढला पाहिजे. म्हणजे त्यानंतर अशी आंदोलने होणार नाहीत.
विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षाकडून कोणते प्रश्न विचारले जावेत यासाठी आज काँग्रेस विधीमंडळ सदस्यांची बैठक बोलावण्यात आली होती, असे सांगून कवळेकर म्हणाले, 2012 पासून गोव्यातील प्रश्न आहे तसेच आहेत. त्यामुळे अधिवेशनात सरकारचे लक्ष वेधण्यासाठी रणनीती ठरवण्यात येणार आहे. अधिवेशनात आठ दिवस विचारण्याएवढे प्रश्न आता आमच्याकडे आहेत.तसेच गोव्यातील समस्या मांडण्याबरोबरच एकही समस्या सुटू नये यासाठी प्रयत्न केला जात आहे.
दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी कोणत्या कारणासाठी राजीनामा दिला आणि नवा अध्यक्ष कोण असेल याविषयी काहीही बोलण्यास कवळेकर यांनी नकार दिला.