पणजी - सीएएला देशविदेशातून समर्थन मिळत आहे. मात्र, केवळ शहरी नक्षलवादीच याचा विरोध करत आहेत. तसेच काँग्रेस, समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष यासारखे ढोंगीपक्ष याला जाणीवपूर्वक विरोध करत आहेत, असे मत राज्यसभा सदस्य तथा गोव्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी केले आहे.
हेही वाचा... राजस्थान : जे. के. लोन रुग्णालयात 100 बालकांचा मृत्यू , विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
पणजीतील भाजप मध्यवर्ती कार्यालयात पत्रकार परिषद आयोजीत करण्यात आली होती. यावेळी तेंडुलकर बोलत होते. शुक्रवारी (दि.3) नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या (सीएए ) समर्थनार्थ पणजीत रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी भाजपचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे.पी. नड्डा उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. त्यावेळी सुमारे 25 ते 27 हजार भाजप कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. सीएएला गोव्यात तसा विरोध झालेला दिसत नाही. ही रॅली दुपारी साडेतीन वाजता पाटो येथून सुरू होणार असून आझाद मैदानावर त्याचे जाहीर सभेत रुपांतर होणार आहे. यामध्ये मुख्यमंत्री, मंत्री, आमदार आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती यावेळी पत्रकार परिषदेत देण्यात आली.
हेही वाचा... भारत-जपान शिखर परिषद लवकरच, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती..
गोवा प्रदेशाध्यक्षाची निवड लवकरच करण्यात येणार आहे. आतापर्यंत 38 मतदारसंघातील समिती निवडण्यात आली आहे, असे विनय तेंडुलकर म्हणाले. यावेळी भाजप सरचिटणीस सदानंद तानावडे, दामोदर नाईक, गोविंद पर्वतकर उपस्थित होते.