पणजी - गोव्याची राजधानी पणजीच्या महापालिका निवडणुकीत भाजपचे आमदार बाबुश मोन्सेरात गटाने 30 पैकी 25 जगांवर विजय मिळवत पालिकेवर निर्विवाद वर्चस्व प्राप्त केले आहे. सहापैकी पाच ठिकाणी भाजप समर्थक विजयी झाले आहेत. तर दक्षिण गोव्यातील कुंकळ्ळी नगरपालिका कॉंग्रेस समर्थकांकडे गेली आहे.
गोव्यातील सहा नगरपालिका, तीन ग्रामपंचायत आणि एका जिल्हा पंचायत मतदारसंघासाठी शनिवारी (दि. 20) मतदान घेण्यात आले होते. यांची मतमोजणी आज सकाळी झाली. पणजी महापालिका मतमोजणी पणजीत तर अन्य नगरपालिकांची मतमोजणी तालुका मुख्यालयात करण्यात आली. यामध्ये पणजी महापालिकेच्या 30 पैकी 25 जागांवर पणजीचे भाजप आमदार बाबुश मोन्सेरात यांच्या गटाने जिंकल्या आहेत. तर 4 जागा कॉंग्रेस समर्थक गटाला तर 1 अपक्ष निवडून आला आहे. तर वाळपई नगरपालिकेत स्थानिक भाजप आमदार विश्वजीत राणे गटाला 9 तर एक जागा अपक्ष उमेदवार जिंकला आहे. काणकोणमध्ये सर्व 12 जागा भाजप समर्थकांनी जिंकल्या आहेत. डिचोलीत 9 जागा भाजप समर्थक, 3 माजी आमदार नरेश सावळ समर्थक तर दोन अपक्ष, पेडणे पालिकेत 6 जागा भाजप समर्थक तर 4 अपक्ष, कुंकळ्ळी 9 कॉंग्रेस समर्थक तर भाजप समर्थक 4 आणि एक अपक्ष असे पक्षीय बलाबल आहे. तीन पंचायतींवर भाजपला फटका बसला आहे.
हेही वाचा - "निलंबनाची मागणी करणाऱ्यांचेच परमबीर हे आज 'डार्लिंग' झालेत"
प्रतिमा कुतिन्हो पराभूत
दक्षिण गोव्यातील नावेली जिल्हा पंचायत पोटनिवडणुकीत प्रदेश महिला कॉंग्रेस अध्यक्ष प्रतिमा कुतिन्हो यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे तेथे अपक्ष उमेदवार एडविन कार्दोज विजयी झाले आहेत. कुतिन्हो यांना 2523 मते, कार्दोज यांना 2895 मते मिळाली आहेत. याठिकाणी आम आदमी पक्षाचे माल्टिडा डिसिल्वा यांनी 2428 मते मिळवली आहेत. तर भाजपच्या सत्यविजय नाईक यांना 994 मते मिळाली आहेत.
हा सांघिक विजय : सदानंद तानावडे
गोव्यातील नगरपालिका आणि महापालिका निवडणुकीत भाजप समर्थक उमेदवारांना मिळालेला विजय हे भाजपचे सांघिक यश आहे. तर कुंकळ्ळी नगरपालिकेत अपयश आले हे प्रदेशाध्यक्ष म्हणून माझे आहे, अशी प्रतिक्रिया गोवा प्रदेश भाजपाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी दिली. पक्षाच्या यशापयशावर आणि बंडोखोरांवरील कारवाईबाबत पक्षाच्या बैठकीत निर्णय घेतला जाईल, असेही ते म्हणाले.
दरम्यान, निवडणूक निकाल जाहीर होताच पणजीचे आमदार बाबुश मोन्सेरात यांनी विजयी उमेदवार आणि समर्थकांसह पणजी मध्ये पायी मिरवणूक काढली.
हेही वाचा - गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याचे काय होणार? मुख्यमंत्री ठाकरेंनी बोलावली बैठक