अहमदनगर - शिवसेना खासदार संजय राऊत ( Shiv Sena MP Sanjay Raut ) यांची कन्या पूर्वशी राऊतचं सोमवारी म्हणजेच आज 29 नोव्हेंबरला लग्न आहे. मुलीच्या लग्नाच्या निमित्ताने आयोजित संगीत कार्यक्रमात त्यांनी चक्क राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंसोबत ( NCP MP Supriya Sule ) ठेका धरला. दोघांचा डान्स करतानाचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे. यावरून भाजपा नेते राधाकृष्ण विखे-पाटलांनी ( BJP Leader Radhakrishna Vikhe Patil ) घणाघाती टीका केली आहे.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची कन्या पूर्वशी राऊत यांचा विवाह सोहळा पार पडतोय. रेनेसाँ या सप्ततारांकित हॉटेलमध्ये हा संगीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पूर्वशी-मल्हार यांच्या विवाहाच्या निमित्ताने संगीत सोहळा पार पडला यात वधूपिता संजय राऊत यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबत केलेला भन्नाट डान्स लक्ष वेधून घेत आहेत. अशावेळी भाजप नेते राधाकृष्ण विखेपाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केलीय. ‘ एसटी कर्मचारी आत्महत्या करत आहेत. शेतकरी आत्महत्या करत आहेत आणि तुम्ही काय करता तर लग्नात नाचता. लग्नात तुम्ही नृत्य करता. एकीकडे लोक आत्महत्या करत आहेत. दुसरीकडे वीज कनेक्शन तोडले जात आहेत. गावची गावे अंधारात आहेत. जनाची नाही तर मनाची तरी ठेवा. हीच महाविकास आघाडीची कर्तबगारी आहे का ? असा खोचक सवाल विखे-पाटील यांनी ठाकरे सरकारला केला.
महाविकास आघाडी सरकारची दोन वर्षे ही फक्त फसवणूकीची होती. भ्रष्टाचाराने सरकार पूर्णपणे बरबटले गेले आहे. कोणत्याही समाज घटकाला हे सरकार न्याय देवू न शकल्याने या सरकारने माफीनाम्याच्या जाहीराती प्रसिध्द केल्या पाहीजेत, अशी खोचक प्रतिक्रीया भाजपा नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.
महाविकास आघाडीला दोन वर्षे पुर्ण झाल्याबद्दल माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला आ.विखे पाटील यांनी उत्तर देताना सरकारच्या जनता विरोधी धोरणावर सडकून टिका केली. मागील दोन वर्षात महिला अत्याचाराच्या मोठ्या प्रमाणात घटना घडल्या. कायदा सुव्यवस्था राखण्यात सरकारला पुर्णत: अपयश आले आहे. राज्यातील शेतकरी निर्माण होत असलेल्या समस्यांमुळे आपले जिवन संपवून घेत आहे. या सरकारच्या काळात एमपीएसीच्या विद्यार्थ्यांनाही आत्महत्या कराव्या लागल्या हे दुर्दैव असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
एका महिलेच्या मृत्यूमुळे मंत्र्यांना घरी जावे लागले. सरकारमधील मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरण रोजच चव्हाट्यावर येत आहेत. त्यामुळे जनतेच्या मनातील सरकारची प्रतिमा मलिन झाली असून, सामान्य माणसाच्या वेदना या सरकारला कळल्या नाहीत. सरकार दोन वर्षात फक्त घोषणा करुन, निर्णय करत बसले. अंमलबजावणी मात्र शुन्य होती. घेतलेले निर्णयसुध्दा या सरकारला मागे घ्यावे लागले त्यामुहे हे युटर्न सरकार असल्याची टिका विखे पाटील यांनी केली.
एसटी चे कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत बोलताना आ.विखे पाटील म्हणाले की, सरकारने वेगवेगळे पर्याय उपलब्ध करुन, त्यांना आश्वस्त केले पाहीजे. पण सरकारची इच्छाशक्ती नाही, त्यांच्या आंदोलनाला आमचा पाठींबा असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. दोन वर्षे झाल्याबद्दल सरकारने प्रसिध्द केलेल्या जाहीरातींबाबत प्रतिक्रीया व्यक्त करताना विखे पाटील म्हणाले की, धन्यवाद तुम्ही नेमके कोणाचे मानत आहात. जनतेची फसवणूक केल्याबद्दल तुम्ही माफीनामे काढले पाहीजेत, असा टोलाही विखे पाटील यांनी लगावला.