पणजी - गोव्याची राजधानी पणजीमध्ये 51वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) सुरू आहे. यानिमित्ताने काल (शनिवार) पहिल्या दिवशी भारतीय पॅनोरमा ज्युरी समितीच्या सदस्यांची पत्रकार परिषद झाली. फिचर फिल्म्स विभागाचे अध्यक्ष जॉन मॅथ्यू मॅथन, बिगर फिचर फिल्म समितीचे अध्यक्ष हौबम पबन कुमार, फिचर फिल्म ज्युरी समितीच्या सदस्य जादूमोनी दत्ता यांच्यासह इतर ज्युरी सदस्य यावेळी उपस्थित होते.
एकमताने सर्व चित्रपटांची निवड -
'आलेल्या प्रवेशिकांमधून महोत्सवासाठी चित्रपटांची निवड करणे हे सर्व ज्युरी सदस्यांसाठी मोठे आव्हान होते. मात्र, कुठलाही वादविवाद न होता आम्ही एकमताने चित्रपटांची निवड केली आहे.
फिचर फिल्मच्या ज्युरी समितीत 12 सदस्य असून ते सर्व उत्तम चित्रपट निर्माते, दिग्दर्शक तर आहेतच, शिवाय विविध चित्रपट विषयक संस्था आणि व्यवसायांमध्ये त्यांचे महत्वाचे स्थान आहे. हे सगळे जण मिळून भारतीय चित्रपटांमधील विविधरंगी पैलूंचे एकत्रित रूप आहेत, अशी माहिती फिचर फिल्म्स विभागाचे अध्यक्ष जॉन मॅथ्यू मॅथन यांनी दिली.
युवा निर्माते-दिग्दर्शकांना मोठी संधी -
यापूर्वीच्या वर्षांच्या तुलनेत, यंदाच्या महोत्सवात अगदी कमी माहितीपट आले आहेत. लघुपटांच्या तुलनेत माहितीपटांची संख्या कमी आहे.' बिगर फिचर फिल्म विभागाला माहितीपट आणि लघुपट विभाग असे म्हटले जावे. अशी माहिती बिगर-फिचर फिल्म गटात आलेल्या प्रवेशिकांविषयी बोलताना दिग्दर्शक आणि बिगर फिचर फिल्म समितीचे अध्यक्ष हौबम पबन कुमार यांनी सांगितले. यंदाच्या महोत्सवात अनेक युवा चित्रपट निर्माते आहेत. 51व्या इफ्फीत 60 ते 70पेक्षा अधिक युवा चित्रपट निर्माते आहेत, ही स्वागतार्ह बाब आहे. या विभागातील पहिला सिनेमा ‘सांड की आंख’ देखील युवा चित्रपट निर्मात्याने बनवला आहे.' असे कुमार यांनी सांगितले. तुषार हिरानंदानी निर्मित सांड की आंख चित्रपटाची उद्घाटनाचा चित्रपट म्हणून निवड करण्यात आला होता. या चित्रपटात असे अनेक पैलू असल्याने तो ज्युरी सदस्यांना विशेष भावला, असेही कुमार यांनी सांगितले.
चित्रपट निर्मात्या आणि पत्रकार तसेच, ज्युरी सदस्य संघमित्रा चौधरी, यांनी यंदाच्या इफ्फीमध्ये आलेल्या नवोदित दिग्ददर्शकांनी त्यांच्या चित्रपटांसाठी घेतलेल्या परिश्रमांचे कौतुक केले. या सर्वांनी आपल्या चित्रपटातून समकालीन विश्व मांडले आहे, असे त्या म्हणाल्या. इंडियन पॅनोरमाच्या बिगर फिचर फिल्म गटात, अंकित कोठारी यांचा ‘पंछिका’ हा गुजराती चित्रपट उद्घाटनाचा चित्रपट आहे.
'हे' आहेत इंडियन पॅनोरामाच्या फिचर फिल्म विभागाच्या ज्युरी समितीचे सदस्य -
- डॉमनिक संगमा, चित्रपट निर्माते आणि पटकथा लेखक
- जादूमणी दत्ता , चित्रपट निर्मात्या, लेखिका आणि पटकथा लेखिका
- कला मास्तर , नृत्यदिग्दर्शक
- कुमार सोहोनी, चित्रपट निर्माते आणि लेखक
- रमा वीज – अभिनेत्री आणि निर्माती
- राममूर्ती बी, चित्रपट निर्माते
- संघमित्रा चौधरी –चित्रपट निर्मात्या आणि पत्रकार
- संजय पूर्ण सिंग चौहान - चित्रपट निर्माते
- सतिन्द्र मोहन – चित्रपट समीक्षक आणि निर्माते.
- सुधाकर वसंता - चित्रपट निर्माते.
- टी प्रसन्न कुमार - चित्रपट निर्माते.
- यु राधाकृष्णन – माजी सचिव, एफएफएसआय
भारतीय पॅनोरामाच्या बिगर फिचर फिल्म विभागाच्या ज्युरी समितीचे सदस्य -
अतुल गंगवार, दिग्दर्शक, पटकथा लेखक - ज्वांगदाओ बोडोसा , चित्रपट निर्माते.
- मंदार तालुकदार, चित्रपट निर्माते
- सज्जन बाबू, चित्रपट निर्माते
- सतीश पांडे, निर्माते-दिग्दर्शक
- वैजयंती आपटे –पटकथा लेखिका आणि निर्मात्या