पणजी - गोव्यातील आंबेडकरवादी साहित्यिक, पत्रकार, छायाचित्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओखळ असलेल्या दादू मांद्रेकर यांचे आज सकाळी निधन झाले. दलित आणि शोषितांच्या न्यायासाठी त्यांनी सातत्याने आवाज उठवला होता.
मांद्रेकर यांनी बहिष्कृत गोमंतक, शापित सूर्य आदीं ग्रंथ लिहिण्यासोबतच विविध भाषिक वृत्तपत्रांतून लेखन करत समाजातील विषमतेवर प्रहार केला. साहित्याच्या माध्यमातून त्यांनी अनेक सभा-संमेलने गाजवली होती. त्यांच्या शापित सूर्य या कविता संग्रहाला गोवा मराठी आकादमीचा तर बहिष्कृत गोमंतक या पुस्तकाला महात्मा फुले आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचार प्रचारक संस्था यांचा पुरस्कार मिळाला.
त्याबरोबरच नागरी हक्कांसाठी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. उत्तर गोव्यातील मांद्रे या त्यांच्यावर अंत्यविधी करण्यात आले. त्यांच्या निधनाबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे.